मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करून रविवारी भाजपच्यावतीने ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. दादर पूर्वेला मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतील भाजप आमदारांनी निदर्शने केली. महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराविरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली. लोढा यांच्यासह प्रभारी आमदार अतुल भातखळकर, योगेश सागर, सुनील राणे, राम कदम, मनीषा चौधरी, पराग शाह आदी आमदारांसह भापजचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबाॅम्बनंतर भाजप आक्रमक झाली आहे. मुंबई पोलिसांना महिन्याला शंभर कोटींच्या वसुलीचे लक्ष्य देणाऱ्या अनिल देशमुखांचा राजीनामा घेईपर्यंत आंदोलन करतच राहू, असा इशारा भातखळकर यांनी यावेळी दिला. या सर्व प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेपुढे येऊन स्पष्टीकरण द्यायला हवे, असेही ते यावेळी म्हणाले.
भाजप सायन सर्कल कार्यालय येथे आमदार प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन करत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. नंतर सर्वांची सुटका करण्यात आली.