मुंबई – मागील काही दिवसांपासून भाजपा-शिवसेना(BJP-Shivsena) यांच्यात संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भाजपा नेत्यांवर लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन आता भाजपानेही आक्रमक प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं आहे. भाजपाचे मुलुंड येथील आमदार मिहीर कोटेचा यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर प्रश्नचिन्ह उभं करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
आमदार मिहीर कोटेचा म्हणाले की, २०० बसेस खरेदीची निविदा काढून ९०० बसेस खरेदी करण्याचं कंत्राट पुर्ननिविदा न काढता देण्यात आले. एक लाख भाग भांडवल असणाऱ्या कंपनीला २८०० कोटी रूपयांच टेंडर, पर्यावरण मंत्र्यांच्या आग्रहाखातर देण्यात आलं का? कॅासेस मोबिलीटीवर महापालिका विशेष मेहेरबान झालीय. संबंधित कंपनी भारतात १ वर्ष आधी स्थापन झाली. कंपनी अनुभव नाही मग काम कसे दिले असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरेंना विचारला आहे.
तसेच कॉसीस ई मोबॅलिटीनं भारतात कधीच बसेस काम केले नाही, त्यांना अनुभवही नाही. केंद्र सरकारने राष्ट्रीय शुद्ध हवा वायू अभियानासाठी मुंबई शुद्ध हवा यासाठी निधी दिला गेला. आता निधी मार्च महिन्यापर्यंच खर्च केला नव्हता म्हणून तात्काळ गडबड करत टेंडर काढले गेले. ही खरेदी कंत्राट फक्त स्वतः फायद्यासाठी बीएमसीनं दिलं का ? याबाबत कॅग आणि कोर्टात जाणार आहे. नेमकं कुणासाठी हे केले गेले? केंद्र सरकारने ३६०० कोटी रूपये या योजनाला दिले. त्या निधीचा योग्य वापर होत नाही. त्यामुळे येणाऱ्या राज्याच्या अधिवेशनात या विषयी मुद्दा मांडू असंही आमदार मिहीर कोटेचा यांनी इशारा दिला.
आयटीत तरतूद ३२५ कोटींची, घोटाळे २५ हजार कोटींचे कसे?
राज्याच्या माहिती-तंत्रज्ञान विभागासाठी देवेंद्र फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या काळात ३५५ कोटी ८६ लाख रुपयांचीच तरतूद झाली. मग या खात्यात २५ हजार कोटींचे घोटाळे कुठून झाले, असा प्रश्न तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विचारला आहे. माहिती तंत्रज्ञान विभागांतर्गत येणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान महामंडळामार्फत विविध शासकीय विभागांची ७२४ कोटी रुपयांची कामे या काळात करण्यात आली. ३५६ कोटींची तरतूद अन् घोटाळे २५ हजार कोटींचे हे न समजण्यासारखे आहे. खासदार संजय राऊत हे आधी मनोरंजन करायचे, आता हवा‘बाण’ सोडत आहेत. कायद्याच्या कसोटीवर असे बेताल आरोप टिकणार नाही अशा शब्दात रवींद्र चव्हाण यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.