Join us

नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 6:51 AM

पनवेल मतदारसंघामध्येही भाजपाची आघाडी, मविआत बिघाडी कायम

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी विधानसभा मतदारसंघासाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. नालासोपारा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांना उमेदवारी मिळाली आहे. या मतदारसंघात भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावरून मागील अनेक दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू होती. या मतदारसंघातून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि डहाणूचे माजी नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्या नावाची चर्चा होत होती; पण गेली तीन दशके भाजपमध्ये सक्रिय असलेले राजन नाईक यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पहिली पसंती दिली आहे.

क्षितिज ठाकूर यांचे आव्हान आहेच!

राजन नाईक यांनी २०१४ साली या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी बविआचे क्षितिज ठाकूर, शिवसेनेचे शिरीष चव्हाण व भाजपचे राजन नाईक यांच्यामध्ये तिहेरी लढत झाली. २०१९ च्या निवडणुकीत क्षितिज यांनी सेनेच्या प्रदीप शर्मा यांचा पराभव केला होता. यावेळेसही या निवडणुकीत क्षितिज ठाकूर व राजन नाईक हे पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

पनवेल मतदारसंघामध्ये मविआत बिघाडी कायम

लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: पनवेल विधानसभेत भाजपच्या वतीने विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ठाकुरांची उमेदवारीदेखील घोषित झाली असताना महाविकास आघाडीत मात्र बिघाडी झाल्याचे दिसत आहे. पनवेलमध्ये शेकापने प्रचार सुरू केला असताना सेनेने पनवेल मतदारसंघावर आपला दावा केला आहे. माजी आमदार बाळाराम पाटील यांनी शेकापचा प्रचार सुरू केला आहे. तर उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी पनवेलवर दावा केला आहे; तर नुकत्याच उद्धवसेनेत प्रवेश केलेल्या भाजपच्या बंडखोर नगरसेविका आणि कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांनीदेखील उद्धवसेनेतून विधानसभा लढविण्यास उत्सुकता दाखविल्याने अद्याप महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला नसताना आपापसांत आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत असलेले काँग्रेस, शरद पवार गट, शेकाप या सर्वच घटक पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रनालासोपारापनवेलमुंबई