मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतलेल्या भारतीय जनता पार्टीने रम्या या काल्पनिक पात्राच्या माध्यमातून विरोधकांवर टीका करत आहे. भाजपाने यावेळी बिघडलेलं घड्याळ दुरुस्त होणार नसून शेवटी ते भंगारातच जाणार असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर रम्याच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रम्याच्या माध्यमातून भाजपाने विरोधकांना लक्ष्य केलं आहे. भाजपाने भाजपाने रम्याच्या माध्यमातून याआधीही शरद पवारांवर ईडी चौकशीच्या विषयावरुन टोला लगावला होता. त्यातच पुन्हा भाजपाने गेल्या काही दिवसांत घडलेल्या नाट्यावरुन तसेच ईव्हीएम, कलम 370 आणि राष्ट्रवादीच्या सभेत भगवा झेंडा असण्याच्या विधानावर भाजपाने शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादीच्या सभांमध्ये 'शिवरायांचा भगवा' आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे राहणार आहेत अशी घोषणा अजित पवार यांनी केली होती. मात्र काही दिवसांनंतर भगवा झेंडा वापरण्याचा निर्णय अजित पवारांचा असून पक्षाचा नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते. तसेच अजित पवारांनी शरद पवारांना न सांगताच अचानक आमदारकीचा राजीनामा दिला होता. मात्र शरद पवार म्हणतील तोच अंतिम निर्णय असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे काका- पुतण्यांचे मत परस्परविरुद्ध असल्याने भाजपाने यावर रम्याच्या भूमिकेतून निशाणा साधला आहे.