मुंबई - काँग्रेसने भाजपाच्या छुप्या डीजिटल प्रचाराच रेड हँड पर्दाफाश केला. मुंबईतील खार येथे, सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा घेऊन ऑडिओ क्लिपद्वारे भाजपाचा प्रचार करणारी प्रचारकार्ड बनिवण्यात येत होते. त्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि कमळाला मतदान करा, असे आवाहन करण्यात येत होते. मात्र, या प्रचारयंत्रणेशी भाजपाचा कुठलाही संबंध नसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून त्याची चौकशी करुन कारवाई होईल, असेही तावडे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारणाला रंग चढू लागला आहे. अशातच काँग्रेसकडून भाजपाच्या छुप्या प्रचार साहित्याचा पर्दाफाश करण्यात आला. मुंबईतील खार येथे भारतीय जनता पार्टीकडून सर्जिकल स्ट्राईकचा प्रचार करत ऑडिओ तंत्राचा वापर करण्यात येत आहे. भाजपाकडून प्रचार कार्ड छापण्यात आलं होतं. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज, कमळाला मतदान करा असे संदेश ऑडिओच्या माध्यमातून देण्यात आल्याचा प्रकार काँग्रेसने उघडकीस आणला. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकासह काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आणि डॉ. राजू वाघमारे यांनी पदाधिकाऱ्यांसह धाड टाकली, त्यावेळी हा प्रकार समोर आला होता. मात्र, भाजपाने याबाबत भूमिका घेताना पक्षाचा याच्याशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. तसेच एखाद्याने मोदींवरील प्रेमापोटी तशी प्रचारयंत्रणा राबवली असेल, तर निवडणूक आयोग याबाबत योग्य ती दखल घेऊन कारवाई करेल. मात्र भाजपाचा या प्रचाराशी कुठलाही संबंध जोडू नये, असेही तावडेंनी म्हटले.
हिंदी आणि मराठी मालिकांमधून होणारा भाजपाचा प्रचारही कुठल्याही दबावाखाली नसल्याचे तावडे म्हणाले. मुळात आम्ही मालिकाच बघत नाही, आम्हाला वेळ कुठंय आणि कोण निर्माते आहेत, हेही आम्हाला माहिती नाही. त्यामुळे त्या मालिकेतील प्रचाराशीही भाजपाचा संबंध नसल्याचे तावडेंनी स्पष्ट केले आहे. मात्र, याप्रकरणी 'तुला पाहते रे' मालिकेच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
दरम्यान, इलेक्टॉनिक संदेशाद्वारे सर्जिकल स्ट्राईकचा वापर करत भाजपा प्रचार करत आहे. यावर काँग्रेसने आक्षेप घेतला. मतदारांना भुलविण्यासाठी भाजपाकडून अशाप्रकारे प्रचार कार्डचं वाटप करण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं होतं की, कोणत्याही प्रकारे निवडणुकीच्या प्रचारात भारतीय लष्कराचा वापर करण्यात येणार नाही असं असताना भाजपाकडून छापण्यात आलेल्या या प्रचार कार्डात सर्जिकल स्ट्राईकचा वापर करण्यात आला आहे. तसेच दिवसाला 5 हजार कार्ड बनविण्यात येतात आणि या कार्डवर जय हिंद स्टीकर चिटकवण्यासाठी असलेल्या मुलांना 400 रुपये दिवसाला दिले जातात. या प्रचार कार्डावर कोणत्याही प्रकाशकाचे नाव नसल्याचं नेमकं निवडणूक आयोगाच्या डोळ्यात धुळफेक करत भाजपाकडून अशाप्रकारे प्रचार केल्याचं उघड झालं आहे. निवडणूक आयोगाकडून संबंधित ठिकाणी असणारे प्रचार कार्ड साहित्य, खोके जप्त करण्यात आले असून येथे काम करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.