भाजपाची प्रतिष्ठा पणाला

By admin | Published: October 25, 2015 01:20 AM2015-10-25T01:20:53+5:302015-10-25T01:20:53+5:30

चिकणघर येथील २७ गावांतील १७ जागांसाठी होत असलेल्या मनपा निवडणुकीत संघर्ष समिती आणि शिवसेना यांच्यातील थेट सामन्यांत सरकारचे मंत्रिमंडळच समितीच्या सहकार्यास उतरले आहे.

BJP's reputation will be won | भाजपाची प्रतिष्ठा पणाला

भाजपाची प्रतिष्ठा पणाला

Next

- अरविंद म्हात्रे,  चिकणघर
चिकणघर येथील २७ गावांतील १७ जागांसाठी होत असलेल्या मनपा निवडणुकीत संघर्ष समिती आणि शिवसेना यांच्यातील थेट सामन्यांत सरकारचे मंत्रिमंडळच समितीच्या सहकार्यास उतरले आहे. २० आॅक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच प्रचाराचा नारळ २७ गावांत फोडला. २४ आॅक्टोबरला पंकजा मुंडे आणि विद्या ठाकूर यांची सभा आणि २५ आॅक्टोबरला भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची तर २६ ते ३० आॅक्टोबर या पाच दिवसांत भाजपाचे आणखी मंत्री २७ गावांत खास प्रचारासाठी येणार आहेत.
येथील २१ जागांमधून दोन ठिकाणी बहिष्कार तर दोन जागा बिनविरोध सोडून उरलेल्या १७ पैकी किमान १५ जागा संघर्ष समितीला मिळतील, असा अंदाज समितीचे नेते व्यक्त करीत आहेत. अंतर्गत सर्व्हेनुसार समितीच्या अंदाजाशी भाजपा सहमत आहे. २७ गावांतील पिसवली, गोळवली, नांदिवली, सोनारपाडा, दावडी, मानपाडा, सागाव, मानगाव आदी भागांत उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने भाजपाच्या मंत्री विद्या ठाकूर यांना पाचारण केले आहे. महापौर शर्यतीत भाजपा जोरदारपणे उतरल्याने जास्तीतजास्त मंत्री २७ गावांत येणार आहेत.
२७ गावांतल्या एकूण २१ प्रभागांपैकी १०५, ११३ बिनविरोध तर ११४, ११९ मध्ये बहिष्कार असे ४ प्रभाग वगळता ८४ आजदे, ८५ सागाव, आजदे, ८६ गोळवली-पिसवली, १०६ चिंचपाडा-नांदिवलीतर्फे अंबरनाथ, १०७ पिसवली, १०८ आडिवली-ढोकाळी, १०९ गोळवली, ११० सोनारपाडा-गोळवली, १११ सागाव-सोनारपाडा, ११२ नांदिवली-पंचानंद, ११५ नांदिवली मीनल पार्क, ११६ मानगाव-सोनारपाडा, ११७ उंबार्ली-भाल-दावडी, ११८ आशेळेगाव कृष्णनगर, ११९ माणेस्वसार, १२० हेदुटणे-कोळे, १२१ घारिवली-काटई-उसरघर, १२२ घेसर-निळजे या १७ प्रभागांत निवडणूक होत आहे. भाजपा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची संघर्ष समिती आणि शिवसेना यांच्यातच आमने-सामने लढाई आहे. यापैकी १० उमेदवार भाजपाच्या कमळ निशाणीवर तर दोन मनसेच्या इंजीनवर आणि पाच उमेदवारांनी कपबशी, बॅट, रोडरोलर, टीव्ही आणि नगारा निशाणी धारण केली आहे. सर्व उमेदवार संघर्ष समितीचे पुरस्कृत आहेत. प्रचाराला सुरुवात झाली असून भाजपाच्या दोन जाहीर सभा झाल्या तर शिवसेनेची अद्याप एकही सभा झालेली नाही. या गावांत निवडणुका पहिल्यांदाच (३२ वर्षांत) होत असल्याने लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

एमआयएमवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा
कल्याण : एमआयएम पक्षाच्या जावेद डोन नामक व्यक्तीवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. विनापरवाना चौकसभा घेऊन धार्मिक आधारावर मतदान करण्याचे आवाहन करणे, याप्रकरणी आयोगाच्या आचारसंहिता पथकाने ही कारवाई केली आहे. यात मोबाइलवरून व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह भाषणात १९९३ च्या बॉम्बस्फोटांप्रकरणी फासावर लटकविण्यात आलेला दहशतवादी याकुब मेमन याला शहीद ठरविण्यात आले आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविला आहे. विशेष म्हणजे रविवारी होणाऱ्या ओवेसीच्या प्रचारसभेला पोलिसांनी परवानगी नाकारली असून त्याला ३ नोव्हेंबरपर्यंत कल्याणमध्ये प्रवेश करण्यासही मज्जाव केला आहे.
बुधवारी प्रभाग क्रमांक ३५, रोहिदासवाडा येथील एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने विनापरवाना चौकसभा घेऊन डोन याने आक्षेपार्ह भाषण केले. या भाषणाची चित्रफीत मोबाइलवरून व्हायरल करून धार्मिक भावना भडकाविण्याच्या दृष्टीने कृ त्य केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवला आहे. कल्याण-डोंबिवली निवडणुकीत अशा प्रकारे कोणीही धार्मिक, जातीय आधारावर मतदान करण्यासाठी वापर करत असेल व प्रलोभनांचा उपयोग करताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
याची सर्व उमेदवारांनी व पक्षांनी नोंद घ्यावी तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, हे पाहावे, असे उपायुक्त तथा केडीएमसी आचारसंहिता कक्षप्रमुख जमीर लेंगरेकर यांनी स्पष्ट केले आहे. केडीएमसीच्या निवडणूक रिंगणात एमआयएमचे सात उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार होती. परंतु, कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने या सभेला परवानगी नाकारून त्याला कल्याणमध्ये प्रवेश करण्यासही मज्जाव केला आहे.

Web Title: BJP's reputation will be won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.