लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक विजयाचा संकल्प मुंबई भाजपने केला आहे. मुंबई भाजपच्या कार्यकारिणीची बैठक रविवारी दादर येथील वसंत स्मृती सभागृहात पार पडली. यावेळी भाजपच्या प्रत्येक बूथवर किमान २५ कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत दिल्या.
आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करून विजयी होईल, असा दावा यावेळी बावनकुळे यांनी केला. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी मार्गदर्शन केले. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक यांच्यासह सर्व आमदार आणि मुंबईतील पदाधिकारी उपस्थित यावेळी होते. बैठकीचा समारोप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाने झाला.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हजारो जण भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. मोठ्या नेत्यांचे पक्ष प्रवेश आम्ही करू, पण प्रत्येक बूथवर किमान २५ पक्ष प्रवेश कार्यकर्त्यांनी करावेत, विशेषतः उद्धव ठाकरे सेनेचे पदाधिकारी त्यांना एवढे कंटाळले आहेत की, ते आपली वाट पाहत आहेत. त्यामुळे कामाला लागा, असे आदेश बानवकुळेंनी कार्यकर्त्यांना दिले. प्रत्येक पदाधिकाऱ्याने २००० घरी प्रवास करणे अपेक्षित असून ५०० घरी धन्यवाद मोदी, ५०० घरांमध्ये फ्रेंडस ऑफ बीजेपी, ५०० युवा वॉरियर्स अशा स्वरूपात कामाला लागायचे आहे, असेही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले.
दीपा पाटील यांचा पक्ष प्रवेशदहीसर येथील वॉर्ड क्रमांक एकच्या शिवसेना (उबाठा) महिला उपविभाग अध्यक्ष दीपा पाटील यांच्यासह शाखाप्रमुख गणेश पाटील व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केला.
एक अकेला मुंबईत सगळ्यांना भारी पडणार- शेलारकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेसह एनडीएचे १५० नगरसेवक मुंबई महापालिकेत विजयी होतील आणि भाजपचाच महापौर होईल हा सोडलेला संकल्प पूर्ण करायचा आहे. त्या दृष्टीने आपल्याला कामाला लागायचे आहे, असे आवाहन आमदार आशिष शेलार यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केले.