भाजपाचा शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप; ऋतुजा लटकेंना उमेदवारी देण्यास विलंब का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 12:19 PM2022-10-13T12:19:22+5:302022-10-13T12:20:07+5:30
कुठलीही गोष्ट घडल्यानंतर भाजपावर आरोप करायचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बंद केले पाहिजे असं भाजपाने म्हटलं आहे.
मुंबई - अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस जवळ आला तरी अद्याप कुठल्याही पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. ऋतुजा लटकेंचा शासकीय नोकरीतील राजीनामा मंजूर न झाल्याने यात पेच निर्माण झाला आहे. तर शिवसेनेने या निवडणुकीत प्लॅन बी तयार ठेवला आहे. या निवडणुकीत ऋतुजा लटकेंना उमेदवारी न देता दुसऱ्याला उभे करण्याचं षडयंत्र शिवसेनाउद्धव ठाकरे गटाकडून सुरू असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
भाजपा आमदार प्रसाद लाड म्हणाले की, ऋतुला लटके वहिनींच्या उमेदवारीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसैनिकांची आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. ऋतुजा लटकेंना तिकीट द्यायची होती तर त्यासाठी विलंब का केला? शिवसेना नेत्यांमध्ये उमेदवारी देण्याबाबत असलेले मतभेद यावरून होते. महापालिकेत सातत्याने २५ वर्ष सत्ता असल्याने महापालिकेचे नियम आणि अटी काय हे शिवसेनेला आम्ही सांगण्याची गरज नाही. तरीदेखील मुद्दामून उशीर करून ऋतुजा लटकेंना राजीनामा देण्यास उशीर करायला लावला. २ राजीनामे देण्यात आले. त्यामागे कुणाचा हात, षडयंत्र होते. कुणाला तिकीट द्यायची होती याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी देणे गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच कुठलीही गोष्ट घडल्यानंतर भाजपावर आरोप करायचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बंद केले पाहिजे. ऋतुजा लटकेंना तिकीट न देण्यामागे शिवसेना ठाकरे गटाचेच कटकारस्थान आहे. शिवसैनिकांना डावलायचं आणि जवळच्यांचवर अन्याय करायचा त्यामुळेच शिवसेनेत बंड झाले. ऋतुजा लटकेंना तिकीट न देण्यामागेही हे षडयंत्र आहे असा आरोप भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केला.
मनसेचा अनिल परबांकडे इशारा
मनसेचे कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी अनिल परबांवर आरोप करत वेगळाच ट्विस्ट केला आहे. मनोज चव्हाण यांनी ट्विट करत म्हटलंय की, मुळात ऋतुजा लटकेताईंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकावून अंधेरी विधानसभेची उमेदवारी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांचा डाव आहे. लटके वहिनींनी हा डाव ओळखावा इतकेच या आशयाचे त्यांनी ट्विट करत अनिल परबांवर आरोप केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"