मंदिरे खुली करण्यासाठी भाजपचा शंखनाद; मंदिरांवर अवलंबून असणाऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 10:08 AM2021-08-31T10:08:03+5:302021-08-31T10:09:05+5:30
मंदिरांवर अवलंबून असणाऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी
मुंबई : राज्यातील मंदिरे अद्याप बंदच असून त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे. तसेच यावर अवलंबून असणाऱ्या पुजारी, व्यापारी व शहरवासीयांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे सांगत मंदिरे खुली करण्याच्या मागणीवर भाजपने सोमवारी राज्यभर शंखनाद आंदोलन केले.
ठाकरे सरकारने मदिरालये सुरू केली व कोट्यवधी रुपयांचा महसूल जमविला. सरकार मालामाल झाले. परंतु, मंदिरे बंद ठेवली. मंदिरे बंद ठेवायची असतील तर आघाडी सरकारने मंदिरांवर अवलंबून असणाऱ्या घटकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भाजपने केली.
भाजप नेते, सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील बाबुलनाथ मंदिराबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर कठोर शब्दांत टीका केली.
महाविकास आघाडी सरकारला केवळ नोटांचा आणि दारूच्या दुकानदारांचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे त्यांना झोपेतून जागे करण्यासाठी भाजपकडून शंखनाद करण्यात येत असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथे सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मंदिरे उघडण्यासाठी सद् बुद्धी मिळावी, असे साकडे पाटील यांनी कसबा गणपतीला घातले आणि गणपतीची महाआरती केली.
उ. महाराष्ट्र गोदाकाठी शंखनाद
भाजप तीर्थक्षेत्र आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली गोदावरी नदीच्या काठी रामकुंड येथे संत महंतांच्या उपस्थितीत शंखध्वनी व घंटानाद करून आंदोलन केले. शिर्डीत साई मंदिराच्या महाद्वारासमोर शंखनाद आंदोलन झाले. आमदार राधाकृष्ण विखे श्रीक्षेत्र कोल्हार येथे आंदोलनात सहभागी झाले. जळगावला हनुमान मंदिराच्या बाहेर शंखनाद आणि घंटानाद करण्यात आला. कार्यकर्त्यांनी नियमांचे उल्लंघन केले.
विदर्भ अंबादेवी मंदिरासमोर आंदोलन
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरासमोर महापौर चेतन गावंडे, आमदार प्रवीण पोटे यांच्या नेतृत्वात शंखनाद आंदोलन करण्यात आले. शेगाव येथील गजानन महाराज मंदिरासमोर आमदार आकाश फुंडकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. तर नागपुरातील विविध मंदिरांसमोर भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीने शंखनाद केला. विदर्भातील इतर सर्व जिल्ह्यांतदेखील भाजप कार्यकर्त्यांनी शंखनाद व घंटानाद करीत मंदिरे उघडण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने केली.
मराठवाडा तुळजापूरला निषेधाची गुढी
उस्मानाबाद/बीड : सर्व काही सुरू झालेले असताना राज्यभरातील मंदिरे मात्र बंद ठेवण्यात आली आहेत. हा भाविकांच्या आस्थेवर सरकारचा प्रहार असल्याचा आरोप करीत सोमवारी भाजपने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुळजाभवानी देवीच्या दारी राज्य सरकारच्या निषेधाची गुढी उभारून आंदोलन केले. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने तुळजाभवानी मंदिरासमोर शंखनाद केला. भरपावसात आंदोलकांनी ‘मंदिर बंद गरिबांचे हाल, ठाकरे सरकार मालामाल..., मंदिर बंद उघडे बार, उद्धवा धुंद तुझे सरकार...’ अशा घोषणा देत सरकारचा निषेध केला.
प. महाराष्ट्र पंढरपूरला आंदोलन
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आले. पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव महाराज पायरीजवळ आंदोलन करण्यात आले. आमदार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आदी उपस्थित होते. अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मंदिरासमोरील दक्षिण महाद्वारासमोर खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.