टॅब घोटाळ्यावरील भाजपाचे मौन संशयास्पद
By admin | Published: December 18, 2015 01:21 AM2015-12-18T01:21:16+5:302015-12-18T01:21:16+5:30
मुंबई महापालिकेतील बारीकसारीक प्रकरणांबाबत आक्रमक पवित्रा घेणाऱ्या भाजपाने, विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या टॅब घोटाळ््याबाबत बाळगलेले मौन संशयास्पद आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेतील बारीकसारीक प्रकरणांबाबत आक्रमक पवित्रा घेणाऱ्या भाजपाने, विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या टॅब घोटाळ््याबाबत बाळगलेले मौन संशयास्पद आहे. टॅबवाटप योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असून, या प्रकरणी आयुक्तांनी चौकशी करावी, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिला आहे.
मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्याची योजना पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आखली. विद्यार्थ्यांना व्हिडीओकॉन कंपनीचे टॅब दिल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र बोल्ड नावाच्या कंपनीचे टॅब विद्यार्थ्यांच्या माथी मारण्यात आले. बोल्ड टॅबची किंमत केवळ २५०० असताना पालिकेने मात्र त्यासाठी ४,८०० रुपये मोजले. आतापर्यंत तब्बल २१ हजार टॅबचे वाटप करण्यात आल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची आयुक्तांनी चौकशी करावी, अन्यथा राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशारा अहिर यांनी दिला. (प्रतिनिधी)
आता गप्प का?
पालिकेतील बारीकसारीक मुद्द्यावर थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेत, उठसूट चौकशीची मागणी करणारे मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार टॅब घोटाळ्यावर गप्प का, असा सवाल करतानाच, शेलारांचे मौन संशयास्पद असल्याची टीका अहिर यांनी केली.