- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भायखळ्यातील प्रसिद्ध राणीबाग व पेंग्विन पाहण्याच्या शुल्कात वाढ करण्यास विरोधी पक्षासह भाजपाचाही विरोध आहे. विरोधकांच्या मदतीने ही दरवाढ फेटाळून शिवसेनेची नाचक्की करण्याची व्यूहरचना भाजपाने आखली आहे. शुल्कवाढीच्या प्रस्तावावर स्थायी समितीमध्ये शुक्रवारी मतदान झाल्यास शिवसेना एकटी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही दरवाढ निम्म्यावर आणण्याचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.पेंग्विनच्या देखभालीचा खर्च जास्त असल्याने राणीबागेच्या शुल्कात वाढ करण्यात येणार आहे. या दरवाढीला गटनेत्यांच्या तसेच बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मात्र या प्रस्तावाला काँग्रेसचा, समाजवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. ही संधी साधून भाजपानेही विरोधाचा झेंडा फडकावला आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या पटलावर शुक्रवारी हा प्रस्ताव मंजुरीसाठी आल्यानंतर यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. परंतु यावर मतदान घ्यावे लागल्यास शिवसेनेचा पराभव होणार आहे. भाजपा आणि विरोधकांचे संख्याबळ अधिक असल्याने शुल्कवाढीचा प्रस्ताव बासनात गुंडाळला जाण्याची शक्यता आहे. भाजपानेही विरोधकांना हाताशी धरून शिवसेनेची फजिती करण्याचे मनसुबे आखले आहेत. त्यामुळे शिवसेनेने नमते घेत या प्रस्तावावर चर्चा करून शुल्कातील प्रस्तावित वाढ कमी करण्याचा तयारी दाखवली आहे. स्थायी समितीमध्ये चर्चा करून यावर उचित तोडगा काढता येईल, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.
दरवाढ रोखण्यास भाजपाची व्यूहरचना
By admin | Published: May 19, 2017 3:33 AM