Join us

पालिकेतील भाजपाचे संख्याबळ वाढले, भांडुप पोटनिवडणुकीत भाजपाची शिवसेनेवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 3:02 AM

मुंबई महापालिकेसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या भांडुप पोटनिवडणुकीत भाजपाने शिवसेनेना धूळ चारून विजय मिळविला आहे. या विजयामुळे भाजपाला शिवसेनेवर तोंडसुख घेण्याची आयती संधी मिळाली आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या भांडुप पोटनिवडणुकीत भाजपाने शिवसेनेना धूळ चारून विजय मिळविला आहे. या विजयामुळे भाजपाला शिवसेनेवर तोंडसुख घेण्याची आयती संधी मिळाली आहे. या एका जागेमुळे पालिकेच्या सत्तेवर थेट परिणाम होणार नाही. तरीदेखील ही एक जागा भाजपासाठी भविष्यात महत्त्वाची ठरणार आहे.प्रभागात चांगला दम असलेल्या कुटुंबाचा उमेदवार गळाला लावण्यासाठी भाजपाने जंगजंग पछाडले होते. त्यामुळेच भांडुप पश्चिमेतील प्रभाग क्र. ११६ च्या पोटनिवडणुकीत भाजपाने सरशी साधली आहे. या प्रभागातील दिवंगत नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या सून जागृती पाटील तब्बल पाच हजार मताधिक्याने भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्या. पक्षांतर्गत असंतोषाचा फटका शिवसेनेच्या उमेदवार मीनाक्षी पाटील यांना थेट बसला. या विजयामुळे भाजपा आणखी सत्तेच्या जवळ गेल्याचे म्हटले जात असले तरी प्रत्यक्ष सत्ता मिळवायची झाल्यास भाजपाला घोडेबाजार केल्याशिवाय गत्यंतर नाही. तथापि, नजीकच्या भविष्यात तरी अशी शक्यता धूसरच आहे.काँग्रेसच्या प्रमिला पाटील २०१७ च्या निवडणुकीत या प्रभागातून निवडून आल्या होत्या. मात्र काही महिन्यांतच त्यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली. त्यामुळे या प्रभागात बुधवारी पोटनिवडणूक पार पडली. या प्रभागात विजय मिळविण्यासाठी भाजपाने जोरदार फिल्डिंग लावली होती. प्रमिला पाटील यांच्या सून जागृती पाटील यांना भाजपाने तिकीट दिले. दिना पाटील यांना मानणारा मोठा वर्ग या प्रभागात आहे. त्यामुळे जागृती पाटील यांना मतदारांची सहानुभूती मिळणार हा भाजपाचा अंदाज खरा ठरला.मतमोजणीच्या दिवशी जागृती पाटील या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. सहाव्या फेरीपर्यंत जागृती यांचा विजय स्पष्ट झाला होता. ११२२९ अशा भरघोस मतांनी त्यांचा विजय झाला. शिवसेनेचे स्थानिक आमदार अशोक पाटील यांची पत्नी मीनाक्षी पाटील यांना ४८९२ मतांनी पराभव पत्करावा लागला. मीनाक्षी पाटील यांचा हा दुसरा पराभव आहे. २०१७ च्या निवडणुकीतही त्यांचा प्रमिला पाटील यांनी पराभव केला होता. त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेतूनच विरोध होता.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाभाजपानिवडणूकशिवसेना