भाजपचे टार्गेट आता ठाणे जिल्हा शत-प्रतिशत
By Admin | Published: November 6, 2014 11:08 PM2014-11-06T23:08:32+5:302014-11-06T23:08:32+5:30
दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्र काबीज केल्यानंतर आता भाजपचे कमळ ठाणे जिल्ह्यात रुजविण्यासाठी पक्ष संघटना सज्ज झाली आहे
अनिकेत घमंडी, डोंबिवली
दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्र काबीज केल्यानंतर आता भाजपचे कमळ ठाणे जिल्ह्यात रुजविण्यासाठी पक्ष संघटना सज्ज झाली आहे. त्यामुळेच वर्षभरात येऊ घातलेल्या नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली महापालिका, तसेच बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणूका शिवसेनेशी फारकत घेऊन निवडणूक लढवण्यात याव्यात, अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी असून शिवसैनिकही विधानसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी संधीच्या शोधात आहेत. मात्र त्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठींकडून आदेश मिळण्याची प्रतिक्षा आहे.
ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये भाजपची अवस्था बिकट असून, पक्ष संघटनही कमकुवत असल्याचे चित्र होते, मात्र आता तसे नसून जाणुनबुजून आपल्यावर तसा ठसा उमटवला गेल्याची भावना पक्षकार्यकर्त्यांमध्ये आहे. ठिकठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व कायम असून भाजपला कायम नमते घ्यावे लागत असल्याचीही कुरबूर सुरु आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत चारपैकी २ आणि विधानसभेत १८ पैकी सर्वाधिक ७ आमदार निवडून आल्यामुळे भाजपमध्ये चैतन्याची लाट पसरली आहे.
शिवसेनेशी युती केल्यामुळे भाजपची पिछेहाट होत असून त्यांचे कर्तृत्व दिसून येत नसल्याने आहे त्याच नगरसेवकांची कात्रीत सापडल्यासारखी स्थिती होत आहे. परिणामी आगामी महापालिका आणि नगरपालिका स्वबळावरच लढवण्याचा आग्रह स्थानिक नेत्यांकडून धरला जात आहे. स्वतंत्र निवडणुका लढल्या तरच पक्षाचे अस्तीत्व जिल्ह्यात रूजणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. आवश्यकता वाटल्यास निकालानंतर बलाबल बघून पक्षश्रेष्ठींनी योग्य ते निर्णय घ्यावेत, असेही त्यांचे म्हणणे आहे.