विजयासाठी भाजपाची कसोटी

By admin | Published: January 28, 2017 03:15 AM2017-01-28T03:15:20+5:302017-01-28T03:15:20+5:30

मुंबईच्या उपनगर जिल्ह्यातील एच ईस्ट वॉर्डमध्ये शिवसेना, काँग्रेस, मनसेचे वर्चस्व राहिलेल्या या भागात भाजपाची खरी कसोटी असेल.

BJP's test for victory | विजयासाठी भाजपाची कसोटी

विजयासाठी भाजपाची कसोटी

Next

मुंबई : मुंबईच्या उपनगर जिल्ह्यातील एच ईस्ट वॉर्डमध्ये शिवसेना, काँग्रेस, मनसेचे वर्चस्व राहिलेल्या या भागात भाजपाची खरी कसोटी असेल. २०१२ सालच्या पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८७ मधून भाजपाचा एकच उमेदवार विजयी झाला होता. त्यामुळे आता संपूर्ण एच ईस्ट वॉर्डमध्ये उमेदवार जिंकून आणण्यासाठी भाजपाचा कस लागणार आहे.
एच ईस्ट वॉर्डमध्ये २०१२ सालच्या मुंबई महापालिका निवडणुकीत ११ प्रभाग होते. या निवडणुकीत शिवसेनेला बहुमत प्राप्त झाले होते. शिवसेनेचे चार नगरसेवक निवडून आल्यानंतर या वॉर्डमध्ये भाजपाचा एक उमेदवार निवडून आला होता. तर काँग्रेसचे तीन, मनसेचे दोन व अपक्ष एक उमेदवार जिंकला होता. २0१२ सालच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८७ मधून भाजपाचे कृष्णा पारकर यांना ९ हजार ८१५ मते मिळाली होती. तर भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अब्दुल तांबोळी यांच्याकडून चांगली लढत देण्यात आली. तांबोळी यांना ६ हजार ८५८ मते मिळाली होती. त्या वेळी पालिका निवडणुकीत युती झाल्याने शिवसेनेचे चार उमेदवार निवडून आले. मात्र भाजपाचा एकच उमेदवार निवडून येतानाच प्रभाग क्रमांक ८१ आणि प्रभाग क्रमांक
८४ मधून उमेदवार पडले होते.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत युती नसल्याने संपूर्ण वॉर्डमध्ये उमेदवार उभे करताना बरीच कसरत करावी लागेल. महत्त्वाची बाब म्हणजे मागील पालिका निवडणुकीत विजयी झालेले कृष्णा पारकर यांच्यासमोरही आव्हान आहे. प्रभागात फेरबदल झाल्याने पारकर यांच्यासमोर आपला मतदार टिकवण्याचे आणि प्रचाराचे मोठे आव्हान असेल. नवीन प्रभाग क्रमांक ८७ मध्ये जुना प्रभाग क्रमांक ८१ आणि ८६ मधील मोठा परिसर समाविष्ट झाला आहे. पूर्वी प्रभाग क्रमांक ८७ हा डवरी नगर, खार रेंज रायफल या नावाने ओळखला जात होता. आता हे दोन्ही परिसर नसून प्रभागात फेरबदल झाले आहेत. त्याच्यामुळे आव्हान वाढले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: BJP's test for victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.