भाजपातील उपरे नाराज
By admin | Published: May 1, 2015 02:03 AM2015-05-01T02:03:05+5:302015-05-01T02:03:05+5:30
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी लाटेच्या प्रभावाने भारतीय जनता पार्टीत दाखल झालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची अल्पावधीतच घोर निराशा झाली आहे.
अल्पावधीत निराशा : ‘गड्या आपलाच पक्ष बरा’ची व्यक्त झाली भावना
संदीप प्रधान - मुंबई
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी लाटेच्या प्रभावाने भारतीय जनता पार्टीत दाखल झालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची अल्पावधीतच घोर निराशा झाली आहे. पक्षाच्या कार्यक्रमांना, बैठकांना बोलावले जात नाही, स्वत:हून गेले तर कुणी ढुंकून पाहत नाही या अवस्थेमुळे ‘गड्या आपला पक्षच बरा,’ अशी भावना काहीजण व्यक्त करीत आहेत.
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट उसळून वर आल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधून अनेकांनी भाजपाचा रस्ता धरला. त्यामध्ये सूर्यकांता पाटील, माधव किन्हाळकर, रमेश शेंडगे, भास्करराव खतगावकर, हबीब फकी, विजय कांबळे, बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित, अजित घोरपडे, पृथ्वीराज देशमुख, सुनील बागुल, बिपीन कोल्हे, अशोक पारखी, एकनाथराव गवळी, अनिल गायकवाड, वसंत वाणी आदींचा समावेश आहे. राज्यात भाजपाची सत्ता आल्यावर रावसाहेब दानवे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवले गेले. भाजपाची सदस्य नोंदणी झाल्याखेरीज नवीन पदाधिकारी नियुक्त करणार नाही, असे दानवे यांनी जाहीर केले.
सदस्य नोंदणीचा सोपस्कार पूर्ण झाला तरी अजून पदाधिकाऱ्यांच्या निवडीची हालचाल सुरू झालेली नाही. महामंडळे व अन्य समित्यांवरील नियुक्त्यांची शक्यताही अजून दिसत नाही. गेली १५ वर्षे सत्तेच्या कोशात राहिलेले दोन्ही काँग्रेसचे नेते सध्या त्यांच्याकडे कुठलीच सत्ता नसल्याने अस्वस्थ झाले आहेत. भाजपाच्या बैठकांना, कार्यक्रमांना या उपऱ्यांना बोलावले जात नाही.
आगीतून फुफाट्यात : स्वत:हून गेले तर सन्मानाची वागणूक दिली जात नाही. या नेत्यांच्या तालुक्यांत, गावांत होणारे कार्यक्रम ठरवताना मूळ भाजपा कार्यकर्त्यांनाच विश्वासात घेतले जाते. मंत्रालयात कामे करताना भाजपा, शिवसेनेचे मंत्री स्वपक्षातील नेत्या-कार्यकर्त्यांना प्राधान्य देतात. यामुळे आगीतून फुफाट्यात येऊन पडल्याची भावना हे नेते व्यक्त करीत आहेत.