कोकणातील भाजप विजय म्हणजे मुंबई महापालिकेची नांदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:07 AM2021-01-19T04:07:47+5:302021-01-19T04:07:47+5:30
कोकणातील भाजप विजय म्हणजे मुंबई महापालिकेची नांदी : शेलार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील ग्रामपंचायत निवडणुकीत ...
कोकणातील भाजप विजय म्हणजे मुंबई महापालिकेची नांदी : शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आहे. जिलेबी-पाफड्याचे राजकारण करू पाहणाऱ्या शिवसेनेला मालवणी खाज्याने उत्तर मिळाले आहे. आजच्या निकालाने कोकणी माणसाने एकप्रकारे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकीतील भाजपच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवल्याचा दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केला.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालावर शेलार म्हणाले की, कणकवली विधानसभा ३९ पैकी २८, तर सावंतवाडी १६ पैकी ९, कुडाळमध्ये १५ पैकी ९ अशा एकूण ७० पैकी एकूण ४५ ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या, तर सेनेला केवळ २० आणि राष्ट्रवादीला एकच ग्रामपंचायत जिंकता आली. त्यामुळे सिंधुदुर्गात भाजपचाच आवाज घुमला आहे. कोकण म्हणजे ‘आम्हीच’ म्हणणाऱ्या शिवसेनेचे कोकणी माणसाकडून गर्वहरण झाले आहे. रत्नागिरीतील दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यातील १४९२ उमेदवारांपैकी भाजपचे ५३६ ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले, तर ५९ गावात भाजपचे सरपंच बसणार आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील भाजपच्या घवघवीत यशाने शिवसेनेचा आभासी फुगा फुटला आहे. कोकणात भगवा फडकला; पण तो भाजपचा आहे. हे निकाल येत्या काळात नवी मुंबईसह ठाणे आणि मुंबई महापालिका निवडणुकीतील भाजपच्या विजयाची नांदी असल्याचे शेलार म्हणाले.
.................