बीकेसी, अंधेरी आणि बोरीवली परिसर ठरले सर्वाधिक प्रदूषित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 01:37 AM2020-01-03T01:37:53+5:302020-01-03T01:38:08+5:30
‘सफर’चा अहवाल : एमएमआरडीएप्रमाणे पालिकेनेही कारवाई करण्याची मागणी
मुंबई : मुंबईच्या हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असून, गुरुवारी पुन्हा एकदा मुंबईची हवा बिघडली. विशेषत: बीकेसी, अंधेरी आणि बोरीवली या परिसरातील हवेची नोंद अत्यंत प्रदूषित असल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे. बीकेसीमधील प्रदूषणास जे घटक कारणीभूत ठरतील; त्यांना पाच हजार रुपये दंड ठोठाविण्यात येईल, असा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला. त्यानुसार मुंबई महापालिकेनेदेखील कार्यवाही करणे गरजेचे आहे, असे मत पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी नोंदविले आहे.
मुंबई प्रदूषित होऊ नये म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबईचा स्वच्छ हवा कृती आराखडा तयार केला आहे़ केंद्र सरकारने हा आराखडा दोनवेळा फेटाळत तिसऱ्यांदा स्वीकारला आहे. मंडळाचा हा आराखडा ठोस, परिपूर्ण नसल्याची टीका पर्यावरणतज्ज्ञांनी केली आहे. येथे उठत असलेल्या धूलीकणांमुळे नागरिकांचा श्वास कोंडला आहे. धूर, धूळ आणि धुके यांच्या मिश्रणाने तयार होणारे धूरके; याव्यतिरिक्त वाहत्या वाºयाने बदललेली दिशा असे अनेक घटक मुंबईच्या प्रदूषणास कारणीभूत असून, यात दिवसागणिक वाढच होत आहे. बोरीवली, अंधेरी, बीकेसी, चेंबूर, वरळी आणि माझगाव हे परिसर सातत्याने प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. विशेषत: या आठवड्यात बीकेसी सातत्याने प्रदूषित क्षेत्र म्हणून नोंदविण्यात आले असून, येथे सुरू असलेली बांधकामे यास कारणीभूत असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. चेंबूर येथील कारखान्यांतून सोडला जाणारा धूर, पश्चिम उपनगरातील कारखाने, सुरू असलेली बांधकामे असे अनेक घटक यास कारणीभूत आहेत.
मुंबई महापालिका जबाबदारी झटकत आहे!
बीकेसीमधील प्रदूषणास जे घटक कारणीभूत ठरतील; त्यांना पाच हजार रुपये दंड ठोठाविण्यात येईल, असा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला. त्यानुसारच, मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषणास जे घटक कारणीभूत आहेत; अशा घटकांवर मुंबई महापालिकेने कारवाई करणे गरजेचे आहे. ही जबाबदारी त्यांची आहे. मात्र मुंबई महापालिका काहीच कार्यवाही करीत नाही; ही खंत आहे.
- भगवान केशभट, अध्यक्ष, वातावरण फाउंडेशन
मुंबई शहर आणि उपनगरात विविध प्रकल्पांचे काम सुरू आहे.
गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत.
कारखान्यांतून प्रदूषित वायू वातावरणात सोडले जात आहेत.
मुंबईत दिवसागणिक दाखल होत असलेल्या वाहनांच्या संख्येत भरच पडत आहे.
‘सफर’ या संकेतस्थळावर हवेचा दर्जा नोंदविण्यात येतो.
डिसेंबरमध्ये २३ दिवस बीकेसीमधील हवेचा दर्जा अत्यंत खालावला होता.
१ ते २२ डिसेंबरदरम्यान मुंबईच्या हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण २ वेळा २०० पार्टिक्युलेट मॅटरहून अधिक नोंदविण्यात आले.
बीकेसीमधील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण १७ वेळा २०० पार्टिक्युलेट मॅटरहून अधिक नोंदविण्यात आले आणि ३ वेळा ३०० पार्टिक्युलेट मॅटरहून अधिक नोंदविण्यात आले.
हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे
प्रमाण पार्टिक्युलेट मॅटरमध्ये (पीएम)
बोरीवली
३०५ अत्यंत वाईट
मालाड
२९१ वाईट
भांडुप
१३२ मध्यम
अंधेरी
३०३ अत्यंत वाईट
बीकेसी ३०६ अत्यंत वाईट
चेंबूर
२२८ वाईट
वरळी
२४७ वाईट
माझगाव
२३५ वाईट
कुलाबा
१३५ मध्यम
नवी मुंबई २४९ वाईट