मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) बांधण्यात आलेला वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) ते चुनाभट्टी दरम्यानचा उड्डाणपूल शनिवारी सकाळपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. या उड्डाणपुलामुळे धारावी आणि सायन जंक्शनवरील वाहतूककोंडीचा प्रश्नही सुटणार आहे. या उड्डाणपुलामुळे वाहनचालकांचा प्रवास तीस मिनिटांनी कमी होणार आहे.
१.६ किमी लांबीचा आणि १७ मीटर रुंदीचा बीकेसी ते चुनाभट्टी या उड्डाणपुलावरील लेन मार्किंग, रस्ता दुभाजकाचे बांधकाम, ध्वनिरोधक यंत्रणा बसवणे, पुलावर संरक्षक जाळ्या बसवणे अशी कामे पूर्ण करण्यात आल्याने हा उड्डाणपूल शनिवारी ९ नोव्हेंबरला सकाळपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तसेच पुलावरून जड वाहने जाण्यास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस लोखंडी कमानी उभारणे, पूर्व द्रुतगती महामार्गावर दिशादर्शक फलक लावणे आणि बसथांब्याची जागा बदलणे अशी कामेही नुकतीच पूर्ण करण्यात आल्याचे एमएमआरडीएच्या वतीने सांगण्यात आले. हा उड्डाणपूल सुरू झाल्यावर ठाणे-नाशिक आणि पनवेल-पुणेच्या दिशेने जलद प्रवास करणे शक्य होणार आहे.