बीकेसी-चुनाभट्टी उड्डाणपूल ९ नोव्हेंबरपासून होणार खुला; तीस मिनिटांची होणार बचत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 12:38 AM2019-11-02T00:38:47+5:302019-11-02T00:39:11+5:30
धारावी ते कलानगर जंक्शन दरम्यानची वाहतूककोंडी फुटणार
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) ते चुनाभट्टी या उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. हा उड्डाणपूल ९ नोव्हेंबर, २०१९ रोजीपर्यंत सुरू करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या उड्डाणपुलामुळे धारावी ते कलानगर जंक्शन दरम्यानची वाहतूककोंडी सुटणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या चारपदरी पुलाची एकूण लांबी सुमारे १.६ किमी असून रुंदी १७.२ मीटर आहे. या उड्डाणपुलामुळे पूर्व उपनगरातून येणाऱ्या प्रवाशांना बीकेसीमध्ये पोहोचण्यास लागणाºया वेळेमध्ये सुमारे तीस मिनिटांची बचत होऊ शकेल. वाहतूककोंडी कमी होणार आहे.
चुनाभट्टी-बीकेसी उड्डाणपूल बांधून तयार आहे़, तरीही हा उड्डाणपूल सत्ताधारी सुरू करायला तयार नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी नुकताच केला होता. हा पूल खुला करण्यास अजूनही टाळाटाळ केली, तर आम्ही तो जनतेसाठी खुला करू, असा इशाराही त्यांनी दिला होता. हा पूल अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे़ अशा अवस्थेत पूल सुरू केला आणि अपघात झाला, तर आम्ही त्यास जबाबदार नाही, असे उत्तर एमएमआरडीएने दिले होते. हा पूल आम्ही ९ नोव्हेंबर, २०१९ पर्यंत सुरू करू, असे एमएमआरडीएने जाहीर केले आहे.
उड्डाणपुलावर लेन मार्किंग करणे, रस्ता दुभाजकाचे बांधकाम, सुमारे १५० मीटर लांबीमध्ये ध्वनिरोधक यंत्रणा बसविणे, दोन रेल्वे ओलांडणी पुलांवर संरक्षक जाळ्या बसविणे अशी कामे प्रगतिपथावर आहेत. वाहतूक पोलिसांनी केलेल्या सूचनांनुसार जड वाहने जाण्यास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस लोखंडी कमानी उभारणे, पूर्व द्रुतगती महामार्गावर दिशादर्शक फलक लावणे आणि बसथांब्यांची जागा बदलणे, अशी कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
या उड्डाणपुलाचा वापर करून पूर्व द्रुतगती महामार्गावरून बीकेसीमध्ये येणाºया वाहनांची संख्या लक्षात घेता, बीकेसीतील वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून महापालिकेसोबत समन्वय साधून दोन ठिकाणी पाच सिग्नल बसविणे, दोन जंक्शनची सुधारणा करणे, बीकेसीतील रस्त्यांवर योग्य त्या सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे अशी कामे अंतिम टप्प्यामध्ये आली आहेत. ही कामे पूर्ण करून उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएमार्फत सांगण्यात आले आहे.