Join us

लग्नसोहळा संपेपर्यंत यांचे काम घरांमधूनच; बीकेसीतील कर्मचाऱ्यांना १५ जुलैपर्यंत 'वर्क फ्रॉम होम'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 9:45 AM

बीकेसीमधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत व राधिका यांचा विवाह सोहळा १२ ते १४ जुलै असा तीन दिवस होत आहे

मुंबई : रिलायन्स उद्योगसमूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त मुंबईतील मुख्य व्यावसायिक केंद्र बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरात कार्यालये असलेल्या अनेक कंपन्या व व्यावसायिक समूहांनी आपल्या कर्मचाऱ्यांना १५ जुलैपर्यंत 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा दिली आहे.

बीकेसीमधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत व राधिका यांचा विवाह सोहळा १२ ते १४ जुलै असा तीन दिवस होत आहे. बीकेसी परिसरात शेकडो कार्यालये आहेत. विवाह सोहळ्यानिमित्त होणाऱ्या गर्दीमुळे कामावर परिणाम होण्याचा धोका लक्षात घेता या भागातील कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. लग्नसमारंभानंतर एक दिवस साहित्याच्या आवराआवरीला लागू शकतो. त्यामुळे कंपन्यांनी एक दिवस वाढवून १५ जुलैपर्यंत वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

हॉटेल बुकिंग फुल्ल, वाहतूकही वळविली

दरम्यान, मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील वाहतूक दोन दिवसांसाठी अन्य मार्गावरून वळविली आहे. विवाहस्थळाच्या आसपासच्या परिसरात वाहने नेण्यास पोलिसांनी प्रतिबंध घातला आहे. सूत्रांनी सांगितले की, अंबानी-मर्चट विवाह सोहळ्ळ्यामुळे संपूर्ण मुंबईतील हॉटेल बुकिंग वाढले आहे. त्यामुळे हॉटेलच्या दरांतही मोठी वाढ झाली आहे. बीकेसीमधील लक्झरी हॉटेलात एका मुक्कामासाठी एक लाख रुपये शुल्क आकारले जात आहे. ट्रायडेंट आणि ओबेरॉय यांसारखी हॉटेल पूर्णतः बुक झाली आहेत. 

टॅग्स :मुंबईमुकेश अंबानी