बीकेसीत प्रदूषण करणाऱ्यांना पाच हजारांचा दंड; एमएमआरडीएचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 02:26 AM2020-01-01T02:26:55+5:302020-01-01T02:28:41+5:30
उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये (बीकेसी) सुरू असलेल्या बांधकामामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निर्देश जारी केले आहेत. या निर्देशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. २६ डिसेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बीकेसीमधील हवा प्रदूषित झाल्याची नोंद करण्यात आली होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. सफर या संकेतस्थळावर नोंदवलेल्या गुणवत्तेनुसार, बीकेसीतील हवेचा अत्यंत वाईट दर्जा नोंदवण्यात आला आहे. आता त्यापाठोपाठ वरळीचा क्रमांक लागत आहे. एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी हवेचे आणि धूलिकणांचे प्रदूषण कमी करण्यासाठी पाण्याचा वापर कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये कास्टिंगचे काम सुरू आहे. या बांधकामामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ परिसरामध्ये उडते. धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी मेट्रो कास्टिंग यार्डमध्ये पाण्याचा वापर करावा याबाबत मेट्रो पर्यवेक्षकाने पाहणी करण्याची सूचना केली आहे. या निर्देशांचे उल्लंघन केल्यास दरदिवशी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. कास्टिंग यार्डमधून बाहेर पडणाºया वाहनांचे टायर स्वच्छ करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जेणेकरून बीकेसीतील मुख्य रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरणार नाही. संबंधित कंत्राटदारांनी याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित कंत्राटदारास दररोज पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचे प्राधिकरणातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई मेट्रो-३चे भूमिगत मार्गाचे बांधकाम सध्या सुरू आहे. या बांधकामादरम्यान मोठ्या प्रमाणावर धूळ बाहेर पडते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असताना धूळ मोठ्या प्रमाणावर पसरली असल्याची बाब समोर आली आहे. मेट्रो मार्ग-३च्या बांधकामाच्या वेळेस संबंधित भागातील धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना आखण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यात अपयशी ठरल्यास संबंधितांवर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
एमएमआरडीएचे मैदान भाडेतत्त्वावर विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी देण्यात येते. त्यावेळी तात्पुरते बांधकाम करणाºया कंत्राटदाराला प्रदूषण रोखण्यासाठी पाण्याचा वापर करण्यासह योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.तसे न केल्यास अनामत रक्कम दंड म्हणून जप्त करण्यात येईल.
धुळीचे प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनेसह बेकायदा पार्किंगही रोखण्यासाठी एमएमआरडीएने पावले उचलली आहेत. बीकेसीत बेकायदा पार्किंग केल्यास वाहनचालकांना एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. बीकेसीतील हॉटेलमध्ये जाणाºया ग्राहकांची, पाहुण्यांची वाहने बीकेसीमधील रस्त्याच्या दुसºया लेनमध्ये उभी करण्यात येतात. संबंधित हॉटेल व्यवस्थापनाने ही वाहने पहिल्या लेनमध्ये असतील याची काळजी घ्यायची आहे.