मुंबई : बीकेसीत घर मिळवण्यासाठी ५ हजार ६०० रुपये भरा आणि ताबा मिळवा; अशा आशयाची जाहिरात वर्तमानपत्रात ‘पत्रका’मार्फत टाकून अनेकांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी सोमवारी एकाला अटक केली आहे. साहिल कासीम शेख (३५) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. तो मुंब्रा येथे राहणारा आहे.शेख याने वर्तमानपत्रातून ‘पत्रकाद्वारे’ बीकेसी परिसरात घर मिळवण्यासाठी ५ हजार ६०० रुपये भरा आणि वर्षभरात घराचा ताबा मिळवा, असे आमिष दाखविले. तो बारावी शिकलेल्या मुलांना कामावर ठेवायचा. त्यानंतर जे लोक त्याची जाहिरात बघून त्याला फोन करायचे त्यांच्याकडून पैसे आणण्यासाठी तो त्याच मुलांना पाठवायचा आणि नंतर पैसे घेऊन पसार व्हायचा. निर्मलनगर पोलीस ठाण्यातही अशी एक तक्रार पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी या प्रकरणी चौकशी करत अखेर शेखला अटक केली. त्याने ही कार्यपद्धती वापरत चार ते पाच जणांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. मात्र हा आकडा वाढू शकतो, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, संशयिताला अटक करून त्याचे अन्य कोणी साथीदार आहेत का, याबाबत चौकशी सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी दिली. तसेच अशा प्रकारे फसवणूक करण्यात आलेल्या लोकांनी पुढे येत तक्रार दाखल करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
बीकेसीत ५ हजारांत घर, एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 1:57 AM