विविध कलाविष्कारांसाठी आता बीकेसीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा मंच; कलाप्रेमींना पर्वणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 06:05 AM2023-03-31T06:05:34+5:302023-03-31T06:06:13+5:30

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आजपासून खुले

BKC is now an international standard platform for various arts | विविध कलाविष्कारांसाठी आता बीकेसीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा मंच; कलाप्रेमींना पर्वणी

विविध कलाविष्कारांसाठी आता बीकेसीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा मंच; कलाप्रेमींना पर्वणी

googlenewsNext

मुंबई : कलाकाराच्या सादरणीकरणाची अत्युच्च अनुभूती रसिक प्रेक्षकांना घेता यावी, यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त आणि आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या तीन कला वास्तू मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये साकारण्यात आल्या आहेत. याचे उद्घाटन आज, ३१ मार्च रोजी होत आहे.

चित्र, नृत्य-संगीत, नाटक अथवा अन्य सांगितीक सादरीकरण अशा विविध कलाविष्कारांच्या मांडणीसाठी तीन सुसज्ज केंद्रांची निर्मिती येथे करण्यात आली असून, या तिन्ही केंद्रांना लाभलेल्या जागतिक आयामांमुळे अनेक जागतिक कलाविष्कारांचा आनंदही भारतीय रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे. ही तीनही केंद्र केवळ सादरीकरणाची व्यासपीठे नाहीत तर त्यांच्या अत्यंत कलात्मक निर्मितीमुळे रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे.

वांद्रे येथील जिओ वर्ल्ड सेंटरमधील ‘फाऊंटन ऑफ जॉय’ या दिमाखदार कारंजाजवळ चार मजली इमारत उभी करण्यात आली असून, तेथे या केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे, द क्युब, ग्रँड थिएटर आणि डायमंड बॉक्स अशी या वास्तूंमधील तीन महत्त्वाची आकर्षणाची केंद्र आहेत. तसेच कला दालनेही उभारण्यात आली आहेत. यापैकी ग्रँड थिएटर हा सादरीकरणासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा मंच आहे. याची आसन क्षमता दोन हजार आहे. याचे प्रकाश संयोजन बहारदार करण्यासाठी तब्बल ८४०० स्वारोस्की क्रिस्टलचा वापर करण्यात आला आहे. तर, अत्युच्च दर्जाच्या आवाजासाठी ध्वनी व्यवस्थादेखील अद्ययावत आहे.

विशेष म्हणजे, याच हॉलच्या मागे अनुवादाचे काही बूथ असून, अन्य भाषांतील काही सादरीकरण असेल तर प्रेक्षकांना हेडफोनद्वारे त्या भाषेचा अनुवाद ऐकण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर, प्रायोगिक रंगभूमी, स्टँडअप कॉमेडी अशा अन्य आविष्कारांसाठी द क्यूबची निर्मिती करण्यात आलेली आहे. १२५ आसन व्यवस्था असलेल्या या केंद्रात लेझर प्रोजेक्शन सिस्टीमसारख्या अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केल्या आहेत. डायमंड बॉक्स हा देखील रसिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकेल. यामध्ये बसून लोकांना कलाकारांचे सादरीकरण विविध सेवा-सुविधांसह अनुभवता येईल.

भारतीय कलांच्या संवर्धनासाठी अद्ययावत सांस्कृतिक कला केंद्राची रिलायन्सने निर्मिती केली आहे. विविध कलांच्या जोपासनेसाठी ही वास्तू निश्चित प्रेरणादायी ठरेल. या माध्यमातून भारत तसेच जगभरातील कलाप्रेमींना एकत्र आणण्यास मदत होईल.
- नीता अंबानी, संस्थापक आणि अध्यक्षा, रिलायन्स फाऊंडेशन

Web Title: BKC is now an international standard platform for various arts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.