मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढतच असून, शुक्रवारी मालाड येथील हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे. विशेषत: बोरीवली, अंधेरी, बीकेसी आणि वरळी या परिसरातील हवाही वाईट नोंदविण्यात आली आहे. दुसरीकडे बीकेसी म्हणजे वांद्रे-कुर्ला संकुल सातत्याने प्रदूषित नोंदविण्यात येत असून, डिसेंबर महिन्यात बीकेसीमधील हवेची गुणवत्ता २३ दिवस २०० पीएम (पार्टीक्युलेट मॅटर) हून अधिक नोंदविण्यात आले आहे. परिणामी बीकेसी हे ‘बिझनेस हब’ आहे की ‘पोल्युशन हब’ असा सवाल पर्यावरण क्षेत्रात कार्यरत कार्यकर्त्यांसह पर्यावरणप्रेमींनी केला आहे.१ ते ३१ डिसेंबर या कालावधीत २७ ते २९ डिसेंबर वगळून मुंबईच्या हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण ७ वेळा २०० पीएमहून अधिक नोंदविण्यात आले आहे. बीकेसी येथील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण २३ वेळा २०० पीएमहून अधिक नोंदविण्यात आले आहे आणि ८ वेळा हे प्रमाण ३०० पीएमहून अधिक नोंदविण्यात आले. येथील सर्वाधिक आकडा ३२३ पीएम असून, बीकेसी हे ‘बिझनेस हब’ आहे की ‘पोल्युशन हब’ असा सवाल उपस्थित केला जात आहे. बीकेसीमधील हवा प्रदूषित होण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलाला लागून म्हणजे कुर्ला डेपो येथे मोठ्या प्रमाणावर भंगारची दुकाने आहेत. गॅरेज आहेत. छोटे-मोठे कारखाने आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलाला लागूनच सांताक्रूझकडे जाणाऱ्या फ्लायओव्हरचे काम सुरू आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात मेट्रो-३ चे काम सुरू आहे. या व्यतिरिक्त प्रदूषणास कारणीभूत ठरणारा सर्वात मोठा घटक म्हणजे येथे सुरूअसलेली बांधकामे.बीकेसीमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक संकुले बांधण्याचे काम सुरू आहे. शिवाय येथे मोठी मैदाने म्हणजे खुल्या जागा आहेत. बीकेसीमध्ये धावत असलेल्या वाहनांच्या संख्येत दिवसागणिक भरच पडत आहे. हे सर्व घटक येथील प्रदूषणास कारणीभूत असून, येथून उठणारी धूळ, धूर आणि धुके यांच्या मिश्रणाने तयार होणारे धूरके बीकेसी प्रदूषित करत आहे.सकारात्मक प्रतिसादवातावरण फाउंडेशनने मुंबईचे वाढते वायुप्रदूषण आणि कृती कार्यक्रम या अनुषंगाने शुक्रवारी शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या सोबत चर्चा केली. लवकरच पक्षाच्या वतीने यासंदर्भातील कृती आराखडा तयार करावा आणि तो महाराष्ट्रभर राबवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन वातावरण संस्थेद्वारे चौधरी यांना करण्यात आले. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घ्यावी, अशी विनंतीही त्यांना करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे समन्वयक राहुल सावंत यांनी दिली. तर सूचनांची योग्य ती दखल घेऊन लवकरात लवकर या संदर्भात चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करू, असा सकारात्मक प्रतिसाद अजय चौधरी यांनी संस्थेला दिला.
बीकेसी : बिझनेस हब आहे की पोल्युशन हब?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 1:17 AM