मुंबई- दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्क मैदान देण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यामध्ये ठाकरे गट, शिंदे गट आणि पालिकेच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. शिंदे गट आणि ठाकरे गटाने उच्च न्यायालयात आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा युक्तीवाद केला. न्यायालयाने तुमचा युक्तीवाद मर्यादेत ठेवा, निर्णयही द्यायचा आहे, असे तिन्ही बाजुंना सांगितले. या युक्तीवादानंतर न्यायालयाने शिवाजीपार्कवर दसरा मेळावा होणार? कोणत्या गटाचा होणार, यावर निर्णय दिला. ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी देण्यात आली आहे.
शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच 'आवाssज'; 'शिवतीर्था'वर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगी
उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाचा निर्णय आम्ही मान्य करतो. काही काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही आमची तयारी करतो, ते त्यांची तयारी करतील, अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे. तसेच आम्हाला वाद-विवाद करायचे नाहीय. आम्हाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार मांडायचे आहे, असंही भरत गोगावले यांनी सांगितलं.
आम्ही शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली होती. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची आम्हाला परवानगी दिली असती, तर आम्ही साजरा केला असता, असं भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिलं. आम्ही बीकेसीच्या मौदानात दसरा मेळावा साजरा करु, बीकेसीदेखील बाळासाहेबांच्या मातोश्रीजवळच आहे, असं विधान भरत गोगावले यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची वेळ एकच असेल का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आता ते आम्ही ठरवू, असंही भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
...तर भविष्यात परवानगी नाकारण्याचे कारण ठरेल; उच्च न्यायालयाची ठाकरेंना महत्वाची अट
दरम्यान, ठाकरे गटाला परवानगी देताना न्यायालयाने कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आश्वासन घेतले. तसेच दोन ते सहा ऑक्टोबर शिवाजीपार्क वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. पोलिसांना संपूर्ण घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे स्वातंत्र्य आहे. याचिकाकर्ते कोणत्याही घटनेला जबाबदार असल्याचे आढळल्यास, भविष्यात त्यांना तिथे दसरा मेळावा नाकारण्याचे कारण ठरू शकते, असे म्हणत पालिकेने आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
दसरा मेळावा गेली अनेक वर्षे होतोय-
न्यायालयाने शिवाजीपार्कवर दसरा मेळावा गेली अनेक वर्षे होतोय. सरकारने ४५ दिवस अशा कार्यक्रमांसाठी राखीव ठेवलेले आहेत, अशी टिप्पणी केली. तसेच सर्वोच्च न्यायालयातील याचिकांवर या निकालाचा परिणाम होणार नाही. ही याचिका फक्त शिवाजी पार्कची जागा दसरा मेळाव्यासाठी दिली जावी यावर आहे, असेही न्यायालयाने सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. पालिकेचा निर्णय हा वास्तविकतेला धरून नाही, पालिकेला परिस्थीती माहिती होती, असे मत न्यायालयाने नोंदविले. तसेच दादर पोलिसांचा अहवाल मान्य होण्यासारखा आहे, असेही न्यायालय म्हणाले.