बीकेसी म्हणजे मुंबई नव्हे; उर्वरित ठिकाणांवरील वायुप्रदूषण रोखण्यासाठी एमएमआरडीए गप्प का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 12:41 AM2020-03-12T00:41:33+5:302020-03-12T06:49:16+5:30
पर्यावरण तज्ज्ञांचा सवाल : ठाणे, रायगडमधील प्रदूषणही कमी करण्याची मागणी
मुंबई : माझगावमधील हवा उपकरणातील बिघाडामुळे बुधवारी दुसऱ्यांदा खराब नोंदविण्यात आली़ बोरीवली, नवी मुंबईतील हवेची गुणवत्ताही घसरली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) वेगाने कारवाई करत आहे. मात्र, प्राधिकरणाची कारवाई केवळ वांद्रे-कुर्ला संकुलापुरतीच (बीकेसी) मर्यादित आहे. एमएमआरडीएचे क्षेत्र मुंबई महानगर प्रदेश असतानाच, प्राधिकरणाने बीकेसी म्हणजे मुंबई नव्हे, हे लक्षात ठेवून मुंबई महानगर प्रदेशातील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी उल्लेखनीय पावले उचलावीत, अशी भूमिका पर्यावरण क्षेत्रात काम करणाºया तज्ज्ञांनी घेतली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातील वायुप्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे़ प्रदूषणाबाबत मुंबई आता दिल्लीशी बरोबरी करू लागली आहे. वायुप्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी महापालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तिकरीत्या कार्यवाही करणे अपेक्षित आहे. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका आता १० ठिकाणी एअर क्वॉलिटी मॉनिटरिंग मशीन लावणार आहेत. या ठिकाणांमध्ये प्रभादेवी, खार, साकिनाका, कांदिवली, देवनारसह उर्वरित सहा ठिकाणांचा समावेश आहे. यासाठी १० कोटी रुपये खर्च केले जातील. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी ‘स्टार रेटिंग प्रोगाम’द्वारे कार्यरत आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे बीकेसीमधील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे़ प्रदूषण करणाºया कंपन्यांना नोटीस बजावण्याचे काम सुरू आहे. महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमएमआरडीए ही तिन्ही प्राधिकरणे त्यांच्या स्तरावर कार्यरत असली, तरी एमएमआरडीएने प्रदूषण कमी करण्यासाठी केवळ वांद्रे-कुर्ला संकुलापुरते मर्यादित राहू नये, तर प्रदेशाचा आवाका लक्षात घेता, प्राधिकरणाने मुंबई, ठाणे आणि रायगडमधील प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मत वातावरण फाउंडेशनचे अध्यक्ष भगवान केशभट यांनी व्यक्त केले आहे. मुंबईसह आसपासच्या परिसरातील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी वातावरण फाउंडेशन अनेक माध्यमांद्वारे कार्यरत असून, महापालिकेसह प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सफरसोबत सातत्याने सल्लामसलत करत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी बीकेसीसोबतच संपूर्ण प्रदेशाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे फाउंडेशनचे म्हणणे आहे.