बीकेसीची कोंडी फुटणार; सर्वंकष वाहतूक आराखडा, सल्लागाराची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 01:06 PM2023-08-18T13:06:28+5:302023-08-18T13:07:03+5:30
या कामाचा कालावधी ९ महिने आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडीला मुंबईकर कंटाळले असतानाच आता दुसरीकडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून वांद्रे - कुर्ला संकुलाकरिता सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. यासंदर्भातील ई निविदा सूचना प्राधिकरणाने जारी केली असून, निविदा दस्तावेज शुल्क १० हजार रुपये आहे. ११ सप्टेंबरपर्यंत दुपारी ३ पर्यंत निविदा दाखल करता येणार असून, या कामाचा कालावधी ९ महिने आहे.
कुर्ला, वांद्रे, सायन, माहीम, खारसह पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावरून आजच्या घडीला बीकेसी गाठण्यासाठी विविध मार्ग आहेत. यात सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडसह एलबीएस मार्गावरून वाहनांचा मोठा भरणा बीकेसीमध्ये होत असतो. ऐन गर्दीच्या वेळी दोन्ही बाजूकडील वाहने बीकेसीमध्ये दाखल होत असल्याने सांताक्रूझच्या विद्यापीठाकडील रस्त्यासह कुर्ल्याकडील एन्ट्री पॉइंटवर मोठ्या प्रमाणावर कोंडी होते. विशेषत: लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहने या कोंडीत मोठी भर घालतात. यावर उपाययोजनेचे अनेक प्रयत्न प्राधिकरण, वाहतूक पोलिस यांच्याकडून केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र कोंडी फुटत नाही. त्यात आता प्राधिकरणाचा वाहतूक आराखडा किती लाभदायी ठरतो? याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
सतत वर्दळ
विशेषत: लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहने या कोंडीत मोठी भर घालतात. यावर उपाययोजनेचे अनेक प्रयत्न प्राधिकरण, वाहतूक पोलिस यांच्याकडून केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र कोंडी फुटत नाही. त्यात आता प्राधिकरणाचा वाहतूक आराखडा किती लाभदायी ठरतो? याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. कारण येथे मोठ्या संख्येने आस्थापने असल्याने येथील रस्त्यांवर सतत वर्दळ असते.