बीकेसीत ८० लाख चौरस मीटर बांधकाम क्षेत्र मिळणार; टोलेजंग इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 05:25 AM2024-08-16T05:25:00+5:302024-08-16T05:25:01+5:30
भविष्यात या बांधकाम क्षेत्राची विक्री करून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा होईल.
अमर शैला, लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य सरकारने वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) भूखंडावर नुकतीच चार एफएसआय देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे बीकेसीतील ई आणि जी ब्लॉकचे मिळून ८० लाख चौरस मीटर बांधकाम क्षेत्र तयार होईल. या निर्णयामुळे बीकेसीत नव्याने सुमारे ३७ लाख चौरस मीटर एवढे बांधकाम क्षेत्र उपलब्ध होणार आहे. त्यातून भविष्यात या बांधकाम क्षेत्राची विक्री करून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा होईल.
बीकेसीत यापूर्वी वाणिज्य वापराच्या भूखंडावर ३ ते ४, तर रहिवासी वापराच्या भूखंडावर १.५ ते ४ एफएसआय दिला जात होता. त्यातच बीकेसीत सोयी-सुविधांसाठी वापरलेल्या भूखंडावरील एफएसआय वापरता येत नव्हता. आता मात्र ही बंधने काढून टाकण्यात आली असून बीकेसीतील ई आणि जी ब्लॉकच्या संपूर्ण क्षेत्रासाठी ग्लोबल एफएसआय लागू केला आहे. त्यातून बीकेसीत अतिरिक्त एफएसआय उपलब्ध होणार आहे. हा अतिरिक्त एफएसआय नव्याने भाडेतत्त्वावर दिल्या जाणाऱ्या भूखंडांचा विकास करताना आणि ई आणि जी ब्लॉकमधील पुनर्विकास होणाऱ्या इमारतींना वापरता येईल. यातून बीकेसीत आणखी टोलेजंग इमारती उभ्या राहतील.
...हे होणार शक्य
- अतिरिक्त एफएसआयमुळे ज्या भागात विमानतळ प्राधिकरणाचे उंचीचे बंधन नाही, तिथे टोलेजंग इमारतींना परवानगी देता येईल.
- ई ब्लॉकमधील इमारतींची उंची कमी आहे. या इमारती पुनर्विकासाला जाताना अतिरिक्त एफएसआय मिळेल.
- सध्या ४० मीटर उंचीच्या असलेल्या अनेक इमारतींना ८० मीटरपर्यंत बांधकाम करता येईल.
अतिरिक्त बांधकामाची सवलतीच्या दरात विक्री
- एमएमआरडीएकडून सध्याच्या आणि नव्याने बांधल्या जाणाऱ्या व्यावसायिक आणि रहिवासी इमारतींना अस्तित्वातील बांधकामापेक्षा ५० टक्क्यांपर्यंत अधिक बांधकाम करण्यासाठी रेडी रेकनरच्या ५० टक्के दर आकारला जाणार आहे. तर ५० टक्क्यांहून अधिक बांधकामासाठी १०० टक्के दराची आकारणी केली जाणार आहे.
- पुनर्विकास होणाऱ्या इमारतींना सध्याच्या बांधकाम क्षेत्रापेक्षा ७५टक्क्यांपर्यंत अधिक बांधकाम करण्यासाठी रेडी रेकनरचा ५०% दर आणि ७५ टक्क्यांहून अधिक बांधकाम करण्यासाठी रेडी रेकनरचा १००%
दर आकारला जाणार आहे.
बीकेसीत किती भूखंड शिल्लक
- बीकेसीचे क्षेत्रफळ साधारणपणे १९९ हेक्टर आहे. यातील १०९ हेक्टर जमिनीवर बांधकाम करता येते.
- जवळपास ४३० हेक्टर एवढे म्हणजेच ४३ लाख चौरस मीटर एवढे बांधकाम करता येत होते. तर अन्य भूखंड सोयी-सुविधांसाठीच्या वापरासाठी आहेत.
- सध्या यातील ७२ हेक्टर एवढ्या भूखंडांचे व्यावसायिक, रहिवासी आणि सामाजिक इमारतींसाठी वाटप झाले आहे.
- या भूखंडांवरील सुमारे २१० हेक्टर म्हणजेच २१ लाख चौरस मीटर बांधकाम क्षेत्र वापरून झाले आहे.
- नव्या ग्लोबल एफएसआयमुळे बीकेसीत सुमारे ८०० हेक्टर म्हणजेच जवळपास ८० लाख चौरस मीटर बांधकाम क्षेत्र तयार होणार असून नव्याने उपलब्ध होणारे बांधकाम क्षेत्र हे जवळपास ३७ लाख चौरस मीटर एवढे असेल.
- सध्या बीकेसीत ५५ लाख ते ६० लाख चौरस मीटर बांधकाम क्षेत्र शिल्लक असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.