मुंबई : कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची सेवा करणाऱ्या बीकेसी कोविड सेंटरच्या कंत्राटी कामगारांचा गेल्या तीन महिन्यांचा पगार थकविल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणी एजन्सीविरोधात १२ जणांनी बीकेसी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या १२ जणांमध्ये वॉर्डबॉय आणि वॉर्डगर्लचा समावेश आहे. रचना प्लेसमेंट असे या एजन्सीचे नाव असून गौरव जोशी हा त्याचा प्रमुख आहे.
'लोकमत'च्या हाती लागलेल्या या तक्रारीनुसार, एप्रिल महिन्यापासूनचा पगार सदर एजन्सीने थकविला आहे. या प्रत्येकाला १८ हजार रुपये महिना पगार देण्याचे जोशी याने कबूल केले होते. मात्र चार महिने झाले तरी त्यांचा पगार दिला नाही. म्हणून सतत ११ जुलै २०२१ पर्यंत त्यांनी जोशी आणि त्याची सहकारी कल्याणी यांना फोन केले, जे त्यांनी उचलले नाहीत, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी ३० जून २०२१ रोजी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला होता. तेव्हा पोलिसांसमोर १० जुलै २०२१ पर्यंत पगार देईन, असे त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र त्याचे पालन केले नाही, असे म्हटले आहे. त्यानुसार त्यांनी या प्रकरणी ११ जुलै २०२१ रोजी लेखी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान यांपैकी फक्त १० जण हे कोविड सेंटरमध्ये कार्यरत होते. ज्यांच्या पगाराबाबत कंपनी व्यवस्थापनाला कल्पना असून ते लवकरच दिले जातील, असे उत्तर जोशी याने वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलताना दिले आहे.
मला तक्रारीबाबत कल्पना नाही !
अद्याप अशा कोणत्याही अधिकृत तक्रारीबाबत मला कल्पना नाही. तरी मी तपासून पाहतो.
- सचिन राणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बीकेसी पोलीस ठाणे