Join us

मुंबईवर ‘सायबर संकटा’चे काळे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:05 AM

मुंबई : कोरोनाचे संकट कायम असताना सायबर गुह्यांवर आळा घालण्याचे आव्हान यंत्रणांसमोर उभे ठाकले आहे. कोरोना महामारीचाही फायदा ...

मुंबई : कोरोनाचे संकट कायम असताना सायबर गुह्यांवर आळा घालण्याचे आव्हान यंत्रणांसमोर उभे ठाकले आहे. कोरोना महामारीचाही फायदा घेत सायबर ठग वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करीत असल्यामुळे नागरिकांच्या डोकेदुखीत भर पडत आहे. गेल्या पाच महिन्यांत मुंबईत सायबर फसवणुकीच्या ९०१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी अवघ्या ९२ गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही चिंता वाढविणारी आकडेवारी पाहता मुंबईवर सायबर संकटाचे काळे ढग अधिक गडद होताना दिसत आहेत.

कोरोनावर उपयुक्त ठरणाऱ्या औषधीबरोबर विविध वैद्यकीय सेवा मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या बिहारच्या टोळीचा नुकताच सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. सिल्पा कंपनीच्या नावाने ही टोळी देशभर फसवणूक करीत होती. अशाच प्रकारे अनेक जण विविध उत्पादक कंपनीच्या नावाखाली गंडा घालत आहेत.

दुसरीकडे एटीएम कार्डची सेवा बंद करण्यात येणार आहे. एटीएम, क्रेडिट कार्ड ब्लॉक झाले आहे. बँक खाते, पेटीएम खाते, गुगल पे, फोन पे खात्याची तसेच, मोबाइल नंबरची केवायसी अपडेट करायची आहे, रिवॉर्ड पॉइंट मिळाले आहेत, कॅशबॅक मिळणार आहे. लॉटरी लागली आहे अशा थापा सायबर गुन्हेगार मारतात. त्यानंतर मोबाइलवर एक लिंक पाठवून डेबिट, क्रेडिट कार्ड, बँक खात्याची माहिती भरून घेतात किंवा एखादे ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडतात किंवा मोबाइलवर क्युआर कोड पाठवून तो स्कॅन करण्यास सांगतात. असे केल्याने आपल्या बँकेच्या खात्याची संपूर्ण माहिती आरोपीला कळते आणि त्याआधारे तो सायबर ठग ऑनलाइन रक्कम काढून घेतो. त्यामुळे सायबर ठगांपासून सावध राहण्याचे आवाहन वेळोवेळी सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

गुन्ह्यांची चिंताजनक आकडेवारी

मुंबई पोलिसांच्या दप्तरी आतापर्यंत क्रेडिट कार्ड फ्रॉड आणि फसवणूक केल्याच्या २०३ गुन्ह्यांसह आक्षेपार्ह ई-मेल/मेसेज/एमएमएस पाठविल्याचे ९२ गुन्हे, बनावट सोशल मीडिया खाते/मॉर्फिंग ई-मेल व मेसेज पाठविल्याप्रकरणी १९ गुन्हे, फिशिंग/हॅकिंग/नायजेरियन फ्रॉडचे ४ गुन्हे, सोर्स कोड टेम्परिंग केल्याचे २ गुन्हे, मीम अटॅक/स्फूपिंग मेलप्रकरणी १ गुन्हा आणि अन्य सायबर फसवणुकीचे ५८० गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या वर्षी याच पाच महिन्यांत ९३२ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यापैकी फक्त ७२ गुन्ह्यांची उकल करण्यात आली.