काळा रंग शुभ की अशुभ? काय वाटतं तरुण पिढीला तुम्हीच वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 01:41 AM2020-01-14T01:41:18+5:302020-01-14T01:41:36+5:30

काळ्या-सावळ्या वर्णाकडे बघण्याचा लोकांचा जरा कल वेगळा असतो. या रंगाकडे बघण्याचा मुला-मुलींचा दृष्टिकोन काय आहे, यावर टाकलेला दृष्टिक्षेप...

Is black color auspicious or ominous? What do you think of the younger generation? | काळा रंग शुभ की अशुभ? काय वाटतं तरुण पिढीला तुम्हीच वाचा!

काळा रंग शुभ की अशुभ? काय वाटतं तरुण पिढीला तुम्हीच वाचा!

googlenewsNext

काळा रंग अशुभ मानला जातो, पण संक्रांतीच्या दिवसांत मुले-मुली उत्साहाने काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. हे झालं त्या दिवसापुरतं, पण , काळ्या-सावळ्या वर्णाकडे बघण्याचा लोकांचा जरा कल वेगळा असतो. या रंगाकडे बघण्याचा मुला-मुलींचा दृष्टिकोन काय आहे, यावर टाकलेला दृष्टिक्षेप...

एखादा रंग चांगला की वाईट, याबद्दल वाद घालणे अथवा आपले त्या रंगाबद्दल मत तयार करणे हे चुकीचे आहे. विज्ञानवादी युगात आपण असे विचार करू शकत नाही. मी या अंधश्रद्धेमध्ये कधीच अडकलो नाही. जगण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या? समाजात वावरताना आपली जबाबदारी काय आहे? या गोष्टीचे आचरण महत्त्वाचे आहे. एखाद्या रंगाबाबत मत तयार करणे हे एकविसाव्या शतकातील तरुणाला न शोभणारी गोष्ट आहे. - अमोघ पवार, एसएमडीएल कॉलेज, कळंबोली.

सध्याची पिढी काळा-गोरा असा भेदभाव करत नाही, राजकारणातही काळा रंग हा निषेध म्हणून वापरतात, परंतु काळा रंग हा ऑलटाइम बेस्ट आहे आणि आता तर काळ्या रंगालाच जास्त मागणी आहे. - मयूरी सुतार, ओरिएंटल कॉलेज, सानपाडा.

‘ब्लॅक इज ऑलवेज ब्युटीफूल’. काळ्या रंगाबाबत कोणी खूप विचार करत असेल, असे मला वाटत नाही. धार्मिक विधीमध्ये काळ्या रंगाला अशुभ मानले जात असले, तरी आज लग्न समारंभात काळ्या रंगाचे कपडे तेवढ्याच आवडीने घातले जातात. काळ्या रंगापासून सर्व रंगांची निर्मिती झाली आहे. - सिद्धी पाटील, जेएसएम कॉलेज, अलिबाग.

रंगाचेही धार्मिकतेशी नाते जोडले जात आहे. पूर्वी या विषयीची कारणे बरोबर असतीलही. मात्र, आता कोणीही काळ्या-गोऱ्या रंगाचा विचार करत नाही. सौंदर्य हे कर्तृत्वात असावे लागते रंगामध्ये नाही. आज फॅशनचा ट्रेंडही बदलला आहे. काळ्या रंगांच्या कपड्यांसाठी कोणता परफ्यूम वापरावा, याच्याही जाहिराती झळकत आहेत. त्यामुळे काळा रंग कित्येकांच्या आवडीचा आहे. - सौरभ भोईर, पीएनपी, कॉलेज, अलिबाग.

आपण जे अन्न खातो, ते काळ्या मातीत तर उगवते, पण अजूनही लोकांचा काळ्या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत का नाही, माहीत नाही. डॉ.अब्दुल कलाम हे त्यांच्या रंगावरून नाही, कर्तृत्वावरून ओळखले जातात. माणसांच्या रंगामुळे त्यांच्यातील बुद्धिचातुर्यता, माणुसकी, आपलेपणा बदलत नाही. - काजल मटकर, एसएनडीटी महिला विद्यापीठ, समाजकार्य विभाग.

पांढºया रंगाचे महत्त्व काळा रंग आहे म्हणून आहे. तरुणांमध्ये रंग, वर्णापेक्षा माणसाच्या कामाला, त्याच्या कर्तृत्वाला जास्त महत्त्व आहे आणि वर्णभेद हा मुळात भारतातील नसून भारताबाहेरील आहे. हा वाद इतर लोक आपल्यात वाढवितात. आता व्यापक विचार करणारे तरुण आहोत. - गौरव संभूस, अभिनेता, डोंबिवली.

पूर्वी काळा रंग हा अशुभ आहे, असे मला वाटत होते, पण आता माझ्या विचारात परिवर्तन झाले आहे. आता मी काळ्या- सावळ्या रंगालाही सारखेच महत्त्व देतो. भगवान कृष्णाचाही रंग सावळा आहे. मग त्यांनीच निर्माण केलेल्या माणसांना आपण वर्णभेदातून पाहणे योग्य नाही, हे मला उमजले. - विजय शेळके, निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालय, चर्चगेट.

वर्णावरून माणूस आणि त्यांच्या विचारांची माहिती मिळत नाही. त्यांच्यातील चांगले गुण कधीही कमी होत नाहीत. मी मैत्री किंवा नाते जुळताना रंगाचा अजिबात विचार करत नाही. त्यापेक्षा समोरच्याचे मन निर्मळ आणि स्वच्छ असावे, यावर भर देतो. - साहिल पडवेकर, विवा कॉलेज, विरार.


जगात सुंदरतेला फार महत्त्व दिले जाते. हे कोठून आले, कोणी ठरविले हे माहीत नाही. सावळा वर्ण असलेली व्यक्ती समोर आल्यास त्यांना पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपण आपल्या विचारांना याच चौकटीत ठेवले आहे. तो बदलणे गरजेचे आहे. सगळ्यांनाच वेगवेगळे ब्युटी प्रॉडक्ट्स माहिती आहेत. त्यांची गरज का वाटू लागली? यातून जी एक वेगळी भावना निर्माण झाली, ती अयोग्य आहे. रंगावरून व्यक्तीची भूमिका ठरविणे चुकीचे आहे. - पूजा कांबळे, साठ्ये महाविद्यालय.

स्वत: ला गोरं करण्याच्या स्पर्धेत सध्या अनेकांनी स्वत:ला वाहून घेतले आहे, ज्यामुळे समाजात रंग भेदभावाला खतपाणी मिळत आहे. यातून विषमता निर्माण होते, पण काही मुले-मुली या रंगभेदाला विरोध करत आहेत. त्यांच्या दृष्टीने माणसाच्या आचार-विचारांना महत्त्व अधिक आहे. - आसमा अंसारी, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी.

माणसाचे संस्कार हे त्याच्या रंगातून नाही, तर त्याच्या वर्तणुकीतून दिसतात. सतेज वर्ण असणारा एखादा माणूस हा नेहमीच चांगलाच असेल, असेही नाही. काळ्या रंगातही लक्षवेधी सौंदर्य असूच शकते. मला असं वाटत की, मैत्री ही एखाद्याच्या वर्णाकडे बघून केली जाऊच शकत नाही. मैत्रीमध्ये मने जुळावी लागतात, रंग नव्हे. - अवनी परांजपे, पोद्दार कॉलेज माटुंगा.

काळा रंग उष्णता अधिक शोषून घेऊन थंडीपासून आपले रक्षण करतो. त्यामुळे या दिवसात काळे कपडे घातले जातात, पण काळ्या-सावळ्या रंगाचा विचार केला, तर आता डस्की स्किनचं आकर्षण जास्त आहे. गोरे लोकही या रंगाला पसंती देतात. त्यामुळे काळ्या-सावळ्या रंगाला विरोध असा काही आता होत नाही. उलट या रंगाला शोभणारे कपडे, ज्वेलरी, मेकअपचे साहित्य तयार होत आहे.
- मृणाली आगरे, वर्तक कॉलेज.

वर्णावरून भेदभाव होता कामा नये. फक्त भारतातच नव्हे, तर इतर देशांमध्येदेखील लोकांच्या रंगावरून पारखलं जातं. जर आपल्या देशातून हा भेदभाव काढून टाकायचा असेल, तर आपल्याला स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे. - समीर शेलार, रूपारेल कॉलेज

रंग किंवा कपडे पाहून कोणाशीही मैत्री होऊ शकत नाही. जो हे पाहून मैत्री करतो, तो कधीच कोणासोबत जास्त काळ नाते टिकवू शकत नाही. - सुजाता चौरसिया (एस एन कॉलेज, भाइंदर)

Web Title: Is black color auspicious or ominous? What do you think of the younger generation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.