मुंबई/परभणी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संवेदनशील आणि कार्यकर्ता म्हणून वावरणारे नेते अशी त्यांनी ओळख बनलीय. नुकतेच, परभणी जिल्ह्यातील एका सभेत त्यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या एका कृतीनेही साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. कारण, त्यांच्या जाहीर सभेत काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवणाऱ्या युवकांना त्यांनी सन्मानपूर्वीक व्यासपीठावर बोलावून घेत त्यांच्याशी चर्चा केली. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांतून समोर आला आहे.
श्रीकांत शिंदे यांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या युवकांशी संवाद साधला. त्यावेळी, मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय देण्याचे काम सरकार करत असल्याचे खासदार शिंदे यांनी त्या युवकांना सांगितले. तसेच पाथरीतील शिवसेना मेळाव्यातही जाहीर केले. खा. शिंदे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देणे हे सरकारचे प्राधान्यक्रम आहे. त्या दृष्टीने सरकार काम करत असून, कायद्यात बसणारे आरक्षण कसे देता येईल, यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आगामी काळात निश्चितच मराठा समाजाला न्याय मिळेल.
युवकांनी का दाखवले काळे झेंडे
खासदार श्रीकांत शिंदे यांचे भाषण सुरू असताना मराठा आरक्षण आंदोलकांनी घोषणाबाजी केली. खा. शिंदे यांनी भाषण थांबवून आंदोलकांना व्यासपीठावर बोलवून घेत त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर आंदोलकांनी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात. आमचा त्यांच्यावर विश्वास असल्याचे आंदोलक म्हणाले.