ब्लॅक फ्रायडे : बाजारात धरणीकंप; जगभरातील विक्रीने गुंतवणूकदार धास्तावले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 12:33 AM2021-02-27T00:33:32+5:302021-02-27T00:33:46+5:30
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहेत
मुंबई : अमेरिकेसह युरोपातील शेअर बाजारामध्ये सुरू झालेल्या मोठ्या विक्रीने तेथील शेअर बाजार कोसळले. त्याचप्रमाणे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहेत. याचा परिणाम होऊन भारतामधील शेअर बाजारही कोसळला आणि गुंतवणूकदारांचे ५.४ लाख कोटी रुपये वाहून गेले. बॉण्डवरील परतावा वाढल्याने शेअरमध्ये गुंतवणूक कमी करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल दिसून आला. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया १०४ पैशांनी घसरला.
मुंबई शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ७८२.६० अंशांनी घसरून खुला झाला. त्यानंतर तो ४८,८९०.४८ अंशांपर्यंत खाली आला. बाजार बंद होताना हा निर्देशांक ४९,०९९.९९ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा तो १९३९.३२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) मध्येही ५६८.२० अंशांनी खाली येऊन १४,५२९.१५ अंशांवर बंद झाला. बाजारात सर्वत्र मंदी दिसून आली.
का घसरला बाजार?
अमेरिकेमधील १० वर्षांच्या बॉण्डवरील परताव्यामध्ये वाढ होऊन तो वर्षातील सर्वाधिक झाला आहे. परिणामी गुंतवणूकदारांनी शेअरमधील धोकादायक गुंतवणूक कमी करण्यास प्रारंभ केला. याचा परिणाम शेअर बाजारामध्ये विक्री वाढण्यात झाला. यामुळे बाजार खाली आले. अमेरिकेतील बाजार घसरल्यानंतर युरोपातील शेअर बाजारही खाली आले. आशियामधील शेअर बाजारही कमी झाले.
कमी जोखमीच्या गुंतवणुकीला प्राधान्य
भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतची आकडेवारी जाहीर होणार असल्याने घेतलेली सावध भूमिका देशांतर्गत मागणी घटल्यामुळे सोने-चांदीच्या खरेदीला मिळत असलेला कमी प्रतिसाद
जीडीपीमध्ये ०.४% वाढ
औद्याेगिक उत्पादनही ०.१ टक्के वाढले, प्रथमच वाढीची आकडेवारी काेराेना महामारीमुळे काेलमडलेल्या अर्थव्यवस्थेत
सुधारणांचे संकेत मिळत आहेत. सलग दाेन तिमाहींमध्ये घसरण झाल्यानंतर जीडीपीमध्ये ऑक्टाेबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत ०.४ टक्के वाढ झाली आहे.
१९ महिन्यांत रुपयासाठी सर्वांत वाईट दिवस
शेअर बाजारातील घसरणीमुळे भारतीय चलन रुपयाचे मूल्यही कमी झाले. अमेरिकन डॉलर मजबूत होत असतानाच परकीय वित्तसंस्थांची गुंतवणूक घटण्याची शक्यता आहे. यामुळे येथील आंतरबँक चलन बाजारामध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य १०४ पैशांनी कमी झाले. डॉलर ७३.४७ रुपये अशा किमतीला बंद झाला. रुपयासाठी शुक्रवार हा १९ महिन्यातील सर्वात वाईट दिवस ठरला आहे.
या घसरणीनंतर आता तेजीचे दिवस संपले की काय?
याची चर्चा गुंतवणूकदारांमध्ये सुरू झाली. पण तज्ञांच्या मते सध्या बाजार चढ-उताराच्या हिंदोळ्यावर आहे. तो आणखी जास्त खाली येण्याची शक्यता कमी आहे.