नोटकल्लोळामुळे ‘काळ्या’ पैशांचा ‘काळा बाजार’ तेजीत
By admin | Published: November 11, 2016 05:32 AM2016-11-11T05:32:36+5:302016-11-11T05:32:36+5:30
भारतीय चलनातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बाद ठरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर करताच अंडरवर्ल्डमध्ये जणू धरणीकंप झाला. हवाला, धमक्या, खंडणी
मनीषा म्हात्रे, मुंबई
भारतीय चलनातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बाद ठरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर करताच अंडरवर्ल्डमध्ये जणू धरणीकंप झाला. हवाला, धमक्या, खंडणी, हप्ते यातून गोळा केलेली करोडो रुपयांची माया व्हाइट करण्यासाठी डॉन आणि त्यांच्या गँगस्टरनी मुंबईच्या मोठ्या बाजारपेठांतील व्यापाऱ्यांना हाताशी धरल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. डॉनच्या नावाने धमकावत एक लाख रुपये व्यापाऱ्यांना देऊन त्यांच्याकडून १० हजार रुपये घेत, अंडरवर्ल्डमधील काळा पैसा व्हाइट करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील अवैध व्यवसायांसह अमली पदार्थांची तस्करी, बनावट नोटांचे रॅकेट, अनधिकृत बांधकाम व्यवसाय, खंडणी, हप्ते या काळ्या धंद्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरुण गवळी, रवी पुजारी, अश्विन नाईक अशा बड्या टोळ्या अजूनही सक्रिय आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर या टोळ्यांतील गँगस्टर्सच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. काळा पैसा व्हाइट करण्यासाठी मुंबईतील मोठ्या बाजारपेठांतील बड्या व्यापाऱ्यांना टार्गेट केले जात आहे. काळ्या धंद्यातील बराचसा पैसा हवालामार्गे परदेशात डॉनपर्यंत पोहोचवण्यात येतो. पोलिसांशी संगनमत करून, सुरू असलेल्या हवाला रॅकेटची पाळेमुळे अजूनही घट्ट आहेत. हवालामार्गे दिवसाला दोन ते तीन हजार करोड रुपयांच्या पाचशे ते हजाराच्या नोटा मुंबईत येत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यामुळे हवाला रॅकेटची व्याप्ती लक्षात येऊ शकेल. मुंबई हवालाचे सर्वांत प्रमुख केंद्र आहे. शिवाय समुद्रमार्गे येणारा माल गोदीतून चोरी होतो. पुढे हा माल दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, कुलाबा, पायधुनी, डोंगरी परिसरात विकला जातो. या सर्व धंद्यांचे धागेदोरे गँगस्टर्स सराईतपणे सांभाळतात. बनावट नोटांच्या तस्करीत दाऊद टोळी सक्रिय आहे. मात्र, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे गँगस्टर्स आणि त्यांच्या पंटर्सची झोप उडाली आहे. नळबाजार, क्रॉफर्ड मार्केट, झवेरी बाजारात दिवसाला कोट्यवधींची उलाढाल होते. त्यात हवालासह खंडणी, हफ्ते, धमक्यांमधून जमा झालेला काळा पैसाही गुंतविला जातो. येत्या निवडणुकांमध्ये राजकीय नेत्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचेही काही गँगस्टरांचे मनसुबे होते. मात्र, आता नोटांवरील बंदीमुळे या पैशांचे करायचे काय, असा प्रश्न त्यांना पडला आहे. मुंबईतील विविध ठिकाणी दडवून ठेवलेला पैसा बाहेर काढत, बाजारपेठांकडे मोर्चा वळविल्याची माहिती एका व्यापाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.