मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कप सेमी फायनलसाठी सोशल मीडियावर विविध ऑफर देत तिकिटांचा काळाबाजार सुरू झाला आहे. याच प्रकरणात मालाडच्या तरुणाला जे.जे. मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आकाश कोठारी (३०) असे आरोपीचे नाव असून तो चार ते पाच पटीने तिकिटांची विक्री करत होता.
पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड कपमधील उपांत्य फेरीचा सामना १५ नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन संघांत वानखेडे स्टेडियम येथे रंगणार आहे. स्टेडियममधून प्रत्यक्ष मॅच पाहण्याकरिता देश-विदेशातील क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. त्यांना बुक माय शो या पोर्टलवर मॅचची तिकिटे उपलब्ध केलेली आहेत.
११ नोव्हेंबर रोजी आकाश कोठारी नावाची व्यक्ती तिकिटांचा काळाबाजार करत असल्याची माहिती जे.जे. मार्ग पोलिसांना मिळाली. तो भारत विरुद्ध न्यूझीलंड या सेमी फायनल सामन्याची तिकिटे त्यांच्या मूळ किमतीपेक्षा चार ते पाच पटीने वाढीव किमतीने क्रिकेटप्रेमींना विकून, क्रिकेट वर्ल्ड कप तिकिटांचा काळाबाजार करून क्रिकेट सामन्याच्या आयोजकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले.
जाहिरातीत काय?जाहिरातीत स्टेडियममधील वेगवेगळ्या ठिकाणच्या तिकिटांसह जेवण, मद्याबाबत विविध दर ठरवून ऑफर देण्यात आल्या होत्या. त्याबाबतचे संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आले आहेत.
अशी तिकिटे घेऊ नकाअनोळखी व्यक्तींकडून अनधिकृतपणे तिकीट खरेदी करू नका. तुमची फसवणूक होऊ शकते. भारत-श्रीलंका सामन्यानंतर मरिन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्येही असे गुन्हे आधीच नोंदवले आहेत. तुम्हालाही बनावट किंवा आधीच स्कॅन केलेली तिकिटे विकली जाऊ शकतात. - डॉ. प्रवीण मुंढे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १
मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जे.जे. मार्ग पोलिस ठाण्याचे एक पथक तैनात करण्यात आले. आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेत कारवाई केली. सेमी फायनल सामन्याची तिकिटे कोठून प्राप्त केली याबाबत त्याच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.