Join us

मुंबईतही ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार; सात जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 1:43 AM

एफडीए आणि गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

मुंबई : ठाणे जिल्ह्यापाठोपाठ मुंबईतील रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन आणि गुन्हे शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईत मेडिकल कर्मचारी, औषधे पुरविणाऱ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची साखळी उद्ध्वस्त करण्यात आली आहे. ही टोळी ५४०० रुपये किमतीच्या इंजेक्शनची तब्बल ३० हजार रुपयांना विक्री करत होती.

कोविड १९ या जागतिक महामारीस कारणीभूत ठरलेल्या रोगाच्या उपचारांत परिणामकारक ठरलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता व मागणी यातील तफावतीमुळे त्याचा काळाबाजार होत असल्याच्या माहितीवरून अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाने मुुंबईत तपास सुरू केला होता.      

मीरा रोड येथील धडाकेबाज कारवाईनंतर मुंबईतील हालचालींवर लक्ष ठेवून असताना, मुलुंड परिसरात रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज आणि गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या पथकाने तपास सुरू केला.

संबंधित आरोपींच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधत, त्यांच्याकडे या इंजेक्शनची मागणी केली. इंजेक्शनवरील छापील किंमत ५ हजार ४०० रुपये असताना, त्याने ते ३० हजार रुपयांना देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने सापळा रचत मुलुंड पश्चिमेकडील एलबीएस रोड परिसरातील बाल राजेश्वर मंदिर येथे बनावट ग्राहक पाठवून विकास दुबे व राहुल गाडा हे रेमडेसिवीर इंजेक्शन विकण्यासाठी आले असताना दोघांना अटक केली. दोघेही लिबर्टी मेडिकल स्टोअर्समध्ये नोकरीला आहेत.

पुढील तपासात गाडा याच्या घरातून हेतेरो कंपनीची ६ इंजेक्शने ताब्यात घेण्यात आली. चौकशीत या औषधांचा काळाबाजार करण्याच्या साखळीत भावेश शहा, आशिष कनोजिया, रितेश ठोंबरे,  गुरविंदर सिंग व सुधीर पुजारी (डेल्फा फार्मास्युटिकल, घाटकोपर) हे सहभागी असल्याचे आढळले. त्यांची चौकशी करून दोन ठिकाणांहून १२ व सापळ्यादरम्यान १ अशा एकूण १३ इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला.            

संबंधित आरोपींविरुद्ध औषध निरीक्षक शरदचंद्र नांदेकर यांच्या फिर्यादीवरून औषध व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० व जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यात गुन्हे शाखेने ७ आरोपींना अटक केली आहे. आरोपी औषध दुकानात सेल्समन अथवा औषध कंपनीचे विक्री प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. ही साखळी संपूर्ण मुंबईत सक्रिय असल्याच्या शक्यतेतून गुन्हे शाखेकड़ून अधिक तपास सुरू आहे.

विक्रीदरम्यान कागदपत्रांकडे दुर्लक्ष 

ही टोळी या इंजेक्शनची विक्री करताना रुग्णांचा कोविड अहवाल, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, रुग्णांचे ओळखपत्र याची मागणीही करत नसल्याचे दिसून आले. शिवाय बिलही देत नाहीत. 

येथे करा तक्रार

रुग्णास औषधे छापील दरापेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास व औषधांचा काळाबाजार होत असल्यास याबाबतची माहिती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ / ०२२-२६५९२३६२ यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहआयुक्त (दक्षता) सुनील भारद्वाज यांनी केले आहे.

सिप्ला आणि हेतेरो कंपनीची इंजेक्शन्स

कारवाईत जप्त करण्यात आलेली इंजेक्शन्स सिप्ला आणि हेतेरो कंपनीची आहेत. ही इंजेक्शन्स आरोपींकड़े आली कशी? यात आणखी किती जणांचा सहभाग आहे? तसेच या कंपनीकड़ून आतापर्यंत किती इंजेक्शन्सचा पुरवठा करण्यात आला, याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखेने नमूद केले. 

नातेवाइकांना बनवले कोविड पॉझिटिव्ह

अटक आरोपींनी नातेवाइकांचे खोटे कोरोना अहवाल दाखवून ही इंजेक्शन्स वितरक कंपनीकड़ून घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार अधिक चौकशी सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांनी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईपोलिस