‘एल्फिन्स्टन’च्या काळ्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:47 AM2017-12-25T01:47:30+5:302017-12-25T01:47:34+5:30

तब्बल ७० लाख प्रवासीसंख्या असलेली उपनगरीय रेल्वे. सरत्या वर्षात रेल्वे मंत्रालयाकडून मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी घोषणांची सरबत्ती केली गेली...

Black memories of 'Elphinstone' | ‘एल्फिन्स्टन’च्या काळ्या आठवणी

‘एल्फिन्स्टन’च्या काळ्या आठवणी

googlenewsNext

मुंबई : तब्बल ७० लाख प्रवासीसंख्या असलेली उपनगरीय रेल्वे. सरत्या वर्षात रेल्वे मंत्रालयाकडून मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी घोषणांची सरबत्ती केली गेली. यात वातानुकूलित लोकलवर विशेष भर देण्यात आला. वर्षाअखेरीस देशातील पहिली वातानुकूलित लोकल उपनगरीय सेवेत दाखल करण्याची घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली. त्यानुसार ती दाखल होत आहे. देशातील पहिली हायस्पीड बुलेट ट्रेनदेखील मुंबईकरांच्या दिमतीला सादर करण्यात आली. मात्र आॅक्टोबर महिन्यात पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे रेल्वे प्रशासनाचा भ्रमाचा भोपळा फुटला.
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर गल्ली ते दिल्लीपर्यंत बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावर आगपाखड करण्यात आली. परिणामी २०१७च्या वर्षाअखेरीस स्वप्नांच्या मानल्या जाणाºया मुंबई शहरातील अपुºया प्रवासी सुविधेत शासन बुलेटचे स्वप्न दाखवत असल्याचे दिसून येत आहे.

नवीन मेधा, बंबार्डिअर ‘एक्सचेंज आॅफर’
मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मध्य रेल्वेवर भारतीय बनावटीच्या मेधा लोकल उपनगरीय रेल्वेत सहभागी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तांत्रिक अडचणींमुळे मेधा पश्चिम रेल्वेला देण्यात आली. मेधा लोकलच्या मोबदल्यात पश्चिम रेल्वेवरील नव्याने दाखल करण्यात आलेल्या बंबार्डिअर लोकल मध्य रेल्वेने घेण्यास तयारी दर्शवली. बंबार्डिअर लोकल मध्य रेल्वेवर धावण्यास सुरुवात झाली आहे. बहुधा विभागीय रेल्वेमध्ये लोकल एक्सचेंज करण्याची हा पहिलीच घटना आहे.

माथेरान टॉय ट्रेन सुरू
१८ महिने बंद असलेली माथेरानची राणी अर्थात माथेरान टॉय ट्रेन सुरू करण्यात रेल्वे प्रशासनाला काही प्रमाणात यश आले. अमन लॉज ते माथेरान हा टॉय ट्रेनचा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. नेरळ ते माथेरान हा पूर्ण मार्ग सुरू करण्यासाठी मार्च २०१८ उजाडण्याची शक्यता मध्य रेल्वेकडून वर्तवण्यात येत आहे.

हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार
मुंबई रेल्वे विकास महामंडळ रेल्वे विकासासाठी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-२ अंतर्गत हार्बर मार्गाचे गोरेगाव स्थानकापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गामुळे दादर आणि अंधेरी स्थानकावरील प्रवाशांचा भार कमी होणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत हा मार्ग कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे, असे एमआरव्हीसीचे म्हणणे आहे.

एल्फिन्स्टन दुर्घटना
एल्फिन्स्टन दुर्घटनेत २३ निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेचे पडसाद सर्व स्तरांवर उमटले. या दुर्घटनेत रेल्वे प्रशासनाच्या संथ कारभारावर बोट ठेवण्यात आले. परिणामी पादचारी पूल उभारण्यासाठी लष्कराला पाचारण करण्याची वेळ आली.

लष्करामार्फत पादचारी पूल
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर करी रोड, आंबिवली आणि एल्फिन्स्टन रोड येथे पादचारी पूल उभारण्याचा निर्णय
घेण्यात आला. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री पीयूष गोयल
आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला.

रेल्वे स्थानके अन् गुगल
मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि गुगल यांच्यात करार करण्यात आला. करारान्वये सीएसएमटी येथील छतावर एलईडी स्क्रीन बसवण्यात आल्या. देशभरातील ऐतिहासिक स्थळे, पोहोचण्याचे ठिकाण, वैशिष्ट्ये असे व्हिडीओ यावर दाखवण्यात येत आहेत. त्याचबरोबर ‘रेलटेल’ अंतर्गत ४२ स्थानकांमध्ये मोफत वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली आहे.

दिवाळीत एसटीचा संप
ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी प्रशासनाच्या गलथान कारभाराविरुद्ध वेतनवाढीसाठी कामगारांनी संप पुकारला. चार दिवस हा संप सुरू राहिला. दरम्यान, संप एसटी अध्यक्ष आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यामुळे चिघळल्याचा आरोप मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केला. परिणामी, ऐन सणासुदीला प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

दुरांतो एक्स्प्रेस घसरली
आसनगाव आणि वाशिंद दरम्यान वेहरोळी वस्तीजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे ९ डबे घसरून अपघात झाला होता. रेल्वे रुळावर पावसामुळे दगड-माती आल्याने सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
मात्र चौकशीअंती रेल्वे अधिकाºयांच्या चुकीमुळे अपघात झाल्याचे समोर आले. एक्स्प्रेसच्या इंजिनासह ९ डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातामुळे मुंबईकडे येणारी अप आणि-डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. लोकल घसरणे आणि वेळापत्रकांमुळे २०१७ वर्षभरात निम्या लोकल फेºयांना लेटमार्क लागल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई-गोवा तेजस एक्स्प्रेस
भारतीय रेल्वेची हायस्पीड ओळख म्हणून निर्माण करण्यात आलेली तेजस एक्स्प्रेस मुंबई-गोवा मार्गावर सुरू करण्यात आली. या एक्स्प्रेसची क्षमता ताशी २०० किमी आहे. मात्र रेल्वे रुळांची क्षमता कमी असल्याने ती १००-१२० किमी प्रतितास या वेगाने धावते.

वातानुकूलित लोकल
मुंबईकरांची लाइफलाइन असलेल्या लोकल सेवेत रेल्वे प्रशासनाने आव्हानात्मक उपक्रम हाती घेत पूर्ण केला तो म्हणजे वातानुकूलित लोकल. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार मार्गावर वातानुकूलित लोकल सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.

अ‍ॅप बेस टॅक्सीचा अहवाल
रिक्षा-भाडेवाढ निश्चितीसाठी बी.सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय अहवाल आॅक्टोबर महिन्यात सादर करण्यात आला. ३०० पानी अहवाल परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना सुपुर्द करण्यात आला. यात अ‍ॅप बेस टॅक्सी कंपन्यांना वेसण घालण्याची तरतूद केली आहे. सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळेल, अशा विविध तरतुदी मांडण्यात आल्या आहेत.

सी-प्लेनची चाचणी यशस्वी
गिरगाव येथे सी-प्लेनची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली. अशा प्रकारच्या विमानांची निर्मिती भारतातच झाली तर उत्पादन खर्च खूपच कमी येईल, असे मत गडकरी यांनी मांडले. मेक इन इंडिया अंतर्गत अशा विमानांची निर्मिती देशात करा, अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. केंद्रीय मंत्री गजपती राजू यांनी हे सी-प्लेन नसून ही तर उडती नौका आहे, अशा शब्दांत वर्णन केले.
 

Web Title: Black memories of 'Elphinstone'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.