मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास कथित गैरव्यवहार प्रकरणी आरोपी असलेले प्रवीण राऊत हे शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांचे ‘फ्रंट मॅन’ होते. प्रवीण राऊत यांच्याद्वारे पत्राचाळ घोटाळ्यातील काळा पैसा संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचला, असा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उच्च न्यायालयात गुरुवारी केला.
संजय राऊत व प्रवीण राऊत यांची विशेष न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०२२ रोजी जामिनावर मुक्तता केली. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. दोघांचाही जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी ईडीने केली आहे. न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठापुढे या याचिकांवर सुनावणी सुरू होती. गुरुवारपासून अंतिम युक्तिवादाला सुरुवात झाली.
ईडीतर्फे ज्येष्ठ वकील अनिल सिंह यांनी उच्च न्यायालयात युक्तिवादाला सुरुवात केली. गुरुवारी ईडीचा युक्तिवाद पूर्ण झाला नसल्याने ते सोमवारीही युक्तिवाद सुरू ठेवतील. गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत. प्रवीण राऊत, गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनी, एचडीआयएलचे राकेश वाधवान व सारंग वाधवान हेसुद्धा आरोपी आहेत.
प्रवीण राऊत फ्रंट मॅनज्येष्ठ वकील अनिल सिंह यांनी गुरुवारच्या सुनावणीत न्यायालयाला सांगितले की, संजय राऊतांच्यावतीने प्रवीण राऊतांनी पत्राचाळीचा कारभार सांभाळला. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे ‘फ्रंट मॅन’ होते. या गैरव्यवहारातील काळा पैसा संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचत होता.