Join us

कुर्ला-अंधेरी रस्त्यावरील काळे मार्ग खुला झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2020 5:37 PM

Road was opened : बैल बाजारातील वाहतूक कोंडी टळणार

मुंबई : कुर्ला-अंधेरी रस्त्यावरील काळे मार्गावरील बंद करण्यात आलेली कमानी ते बैल बाजार अशी एक दिशा वाहतूक आता सुरु झाली आहे. हा रस्ता वाहतूकीसाठी खुला झाल्याने आता कुर्ला ते अंधेरी रस्त्यासह बैलबाजार आणि लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आता काळे मार्ग दोन्ही दिशेने धावणार असून, या मार्गावर अनधिकृतरित्या उभ्या केलेल्या वाहनांवरही कारवाई केली जावी. अन्यथा पुन्हा वाहतूक कोंडीत भर पडेल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

सुमारे दोनएक वर्षांपूर्वी येथील दुरुस्तीचे कारण पुढे करत प्रशासनाने काळे मार्गावरील कमानी ते बैलबाजार ही एक दिशा वाहतूक बंद केली होती. तर बैलबाजार ते कमानी ही वाहतूक सुरु ठेवली. कमानी ते बैलबाजार अशी वाहतूक बंद केल्यानंतर घाटकोपरहून येणारी वाहने लाल बहादूर शास्त्री मार्गावरून मगन नथुराम मार्गे बैलबाजार गाठू लागली. एवढा मोठा वळसा घालताना अशोक लेलँड येथील वळणावर वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागली. यात ही वाहने मगन नथुराम मार्गावर दाखल झाल्याने येथील गर्दी आणखी भर पडली; आणि वाहतूकीची कोंडी झाली. मुळात मगन नथुराम मार्गावर बाजार बसत असून, सायंकाळी येथून मोठी वाहतूक वाहू लागल्याने बाजाराला अडचणी येऊ लागल्या. तशाच अडचणी वाहनांनाही येऊ लागली. त्यात नो एन्ट्रीमधून प्रवास करणा-यांनी नाकी नऊ आणले. सायंकाळी तर येथे मुंगी शिरायला जागा नसायची. त्यामुळे अडचणी होत्या. कुर्ला येथील काळे मार्गावरील समस्येची दखल अखेर येथील मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांनी घेतली. प्रशासनाला हा विषय समजावून सांगत यामुळे नेमक्या काय अडचणी येत आहेत हे सांगितले. येथे अपघातांना आमंत्रण मिळत असल्याचे सांगितले.

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. शिशु विकास मंदिर, शेठ ईश्वरदास भाटीया हायस्कूल आणि महापालिका शाळा असून, बाजारपेठ येथे आहे. येथील मोठया वाहतूकीचा त्रास होत असून, काळे मार्गावरील बंद करण्यात आलेली एक दिशा वाहतूक पुन्हा सुरु करा, असे म्हणणे तुर्डे यांनी मांडले. तेव्हा कुठे आता कित्येक वर्षांनंतर काळे मार्गावरील कमानी ते बैल बाजार ही एक दिशा वाहतूक सुरु झाली असून, आता वाहतूक कोंडी होणार नाही असा दावा केला जात आहे. दरम्यान, आता येथील अनधिकृत पार्कींगवर देखील काम झाले पाहिजे. शिवाय मगन नथुराम मार्गावर एका दिशा मार्गाने म्हणेज विरुद्ध दिशेने जी वाहने प्रवेश करतात त्यांनाही आवर घातला पाहिजे. कारण असे केले तर साहजिकच वाहतुक कोंडी होणार नाही, असे स्थानिक राकेश पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :कुर्लामुंबईरस्ते वाहतूकरस्ते सुरक्षा