मुंबई : सोमवार २१ आॅगस्ट रोजी श्रावण अमावास्येच्या दिवशी, अमेरिकेतील चौदा राज्यांतून सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती दिसणार आहे. त्यासाठी जगभरातून अनेक खगोलप्रेमी लोक अमेरिकेत गोळा होणार आहेत. या सूर्यग्रहणातील खग्रास स्थिती जास्तीत जास्त दोन मिनिटे चाळीस सेकंद दिसणार आहे, असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.दरम्यान, हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. हे सूर्यग्रहण संपूर्ण अमेरिका, हवाई, उत्तर पूर्व प्रशांत महासागर, युरोपचा काही भाग आणि पश्चिम आफ्रिकेचा काही भाग येथून दिसणार आहे.तसेच या सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती अमेरिकेच्या ओरेगॉन, इडाहो, व्योमिंग, मोंटाना, इओवा, कॅनसन्स, नेब्रास्का, मिसौरी, इलिनोइस, केनटकी, टेनेसा, जार्जिया, उत्तर करोलिना आणि दक्षिण करोलिना या चौदा राज्यांतून दिसणार आहे. भारतीय वेळेप्रमाणे रात्री १०-१८ पासून उत्तर रात्री १-३१ पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणांहून खग्रास स्थिती दिसणार आहे. यानंतर, ८ एप्रिल २०२४ रोजी होणाºया सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती अमेरिकेच्या बारा राज्यांतून दिसणार आहे.त्यानंतर, १२ आॅगस्ट २०४५ रोजी होणाºया सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती अमेरिकाच्या दहा राज्यांतून दिसणार आहे. दरम्यान, भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी २६ डिसेंबर २०१९ रोजी मिळणार आहे, तसेच खग्रास सूर्यग्रहण भारतातून २० मार्च २०३४ रोजी काश्मीरमधून दिसणार आहे, अशीही माहिती सोमण यांनी दिली.
अमेरिकेतून सोमवारी दिसणार काळा सूर्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 5:25 AM