मुंबई, दि. 18 - येत्या सोमवारी (२१ आॅगस्ट) श्रावण अमावास्येच्या दिवशी अमेरिकेतील चौदा राज्यातून सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती दिसणार आहे. त्यासाठी अमेरिकेच्या इतर भागातून आणि जगातून अनेक खगोलप्रेमी अमेरिकेतील या चौदा राज्यांत सूर्यग्रहणातील छायाप्रकाश लहरी, डायमंड रिंग, प्रभाकिरिट ( करोना ) , भर दिवसा होणा-या अंधारात घडणारे ग्रह- तारकांचे दर्शन इत्यादी सुंदर अविष्कार पाहण्यासाठी एकत्र येत आहेत. या सूर्यग्रहणातील खग्रास स्थिती जास्तीत जास्त दोन मिनिटे चाळीस सेकंद दिसणार आहे. या सूर्यग्रहणाविषयी अधिक माहिती देताना पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण म्हणाले की, हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. हे सूर्य ग्रहण संपूर्ण अमेरिका, हवाई, उत्तर पूर्व प्रशांत महासागर, युरोपचा काही भाग आणि पश्चिम आफ्रिकेचा काही भागातून दिसणार आहे.
या सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती अमेरिकेच्या ओरेगॉन ,इडाहो,व्योमिंग, मोंटाना,इओवा, कॅनसन्स, नेब्रास्का,मिसौरी, इलिनोइस, केनटकी,टेनेसा,जार्जिया, उत्तर करोलिना आणि दक्षिण करोलिना या चौदा राज्यातून दिसणार आहे. ब-याच कालावधीनंतर अमेरिकेच्या मोठ्या भागातून हे खग्रास सूर्यग्रहण दिसणार असल्याने खगोलप्रेमीनी त्या भागांत गर्दी केली आहे. विमान कंपन्यांनी प्रचंड भाडेवाढ केली असून खग्रास पट्ट्यातील हाॅटेल्सनीही भाडे दुप्पट केले आहे. ग्रहण पहाण्याचे चष्मे मात्र सर्वत्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत.वाहतूक व्यवस्थाही उत्तम प्रकारे ठेवण्यात येत आहे. त्यामुळे येत्या सोमवारी २१ आॅगस्ट रोजी अमेरिकेत मोठा ' सूर्यग्रहणोत्सव ' साजरा होत आहे. यासाठीची पूर्वतयारी खूप अगोदरपासून करण्यात आली आहे. २१ आॅगस्टला होणारे खग्रास सूर्यग्रहण हे १४५ सरॅस ग्रहण चक्रातील आहे. खग्रास सूर्यग्रहण दिसण्यास ओरेगाॅन येथून प्रारंभ होणार असून दक्षिण करोलिना येथे अखेर होणार आहे, अमेरिकेतील वेधशाळांनी वर्तविलेला हवामानाचा अंदाज बर्याच प्रमाणात खरा ठरतो. सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती पाहणारे लोक वेधशाळांच्या अंदाजावर लक्ष ठेवून आहेत. भारतीय वेळेप्रमाणे २१ आॅगस्ट रोजी रात्री १०:१८ पासून उत्तर रात्री ०१:३१ पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणांहून खग्रास स्थिती दिसणार आहे. यानंतर ८ एप्रिल २०२४ रोजी होणा-या सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती अमेरिकेच्या बारा राज्यातून दिसणार आहे. त्यानंतर १२ आॅगस्ट २०४५ रोजी होणा-या सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती अमेरिकाच्या दहा राज्यातून दिसणार आहे.
भारतातून जरी हे खग्रास सूर्यग्रहण प्रत्यक्ष पाहता येणार नसले तरी टीव्हीच्या आणि संगणकाच्या पडद्यावर आपणांस ग्रहणाचे अविष्कार पाहता येतील असेही श्री. दा. कृ. सोमण यांनी सांगितले. भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी २६ डिसेंबर २०१९ रोजी मिळणार आहे. तसेच खग्रास सूर्यग्रहण भारतातून २० मार्च २०३४ रोजी काश्मीरमधून दिसणार आहे, असेही त्यांनी सांगितले.