काळ्या यादीतील ठेकेदाराला पालिकेचे दरवाजे बंंद
By admin | Published: May 28, 2017 02:36 AM2017-05-28T02:36:45+5:302017-05-28T02:36:45+5:30
नालेसफाई घोटाळ्यात दोषी ठरल्याने, आर. इ. इन्फ्रा या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. मात्र, पालिका अधिकारी आजही मेहरबान असल्याने, आर. इ. इन्फ्राचे
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नालेसफाई घोटाळ्यात दोषी ठरल्याने, आर. इ. इन्फ्रा या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. मात्र, पालिका अधिकारी आजही मेहरबान असल्याने, आर. इ. इन्फ्राचे नाव वापरून देव इंजिनीअर्सला नव्याने कंत्राट देण्याचा प्रस्ताव एसडब्लूडी विभागाने स्थायी समिती समोर आणला होता. हा प्रस्ताव परत पाठवल्यावरही पुन्हा तसाच प्रस्ताव प्रशासनाने आणल्याने भाजपाने यास विरोध केला. अखेर हा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढावली आहे.
मुंबईत दोन वर्षांपूर्वी नालेसफाई घोटाळा उघड झाला. या घोटाळ्यात पहिल्यांदा ज्या तीन ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले, त्यामध्ये आर. इ. इन्फ्रा.चे नाव आहे. एखाद्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्यावर त्याला दिलेले काम काढून घेतले जाते. त्या कामासाठी नव्याने निविदा काढून इतर ठेकेदारांकडून काम करून घेतले जाते. तरीही एसडब्लूडीच्या अधिकाऱ्यांनी गोवंडीच्या रफिकनगर नाल्याचे व अहिल्याबाई होळकर नाल्याचे आर. इ. इन्फ्राला दिलेले काम सुरूच ठेवले. आर. इ.कडून कोणतीही बँक अथवा कागदपत्रांची पूर्तता न करताच, हे कंत्राट देण्यात आले.
इतकेच नव्हे, तर काळ्या यादीत टाकलेल्या आर. इ. इन्फ्राचे नाव वापरून, पूर्व उपनगरातील एल, एम पूर्व व एम पश्चिम विभागातील नलिका मोरीचे पेटिका मोरीमध्ये रूपांतर करण्याचे व सध्याच्या पेटिका मोरींचे पूर्ण बांधकाम, पुनर्रचना करण्यासाठीच्या ६ कोटी ७२ लाखांचे कंत्राट देव इंजिनीअर्सला देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला होता.
आर. इ. इन्फ्राला दोन वर्षांपूर्वी काळ्या यादीत टाकले असताना, त्याचे नाव व त्याने केलेली कामे पुढे करून, देव इंजिनीअर्सला काम का दिले जात आहे? असा प्रश्न भाजपाने
केला. यामुळे प्रशासनाने प्रस्ताव मागे घेतल्याने, देव इंजिनीअर्समार्फत
आर. इ. इन्फ्राला मिळणारे
कंत्राट मिळण्याआधीच रद्द झाले
आहे.
- एखाद्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्यावर त्याला दिलेले काम काढून घेतले जाते. त्या कामासाठी नव्याने निविदा काढून इतर ठेकेदारांकडून काम करून घेतले जाते.एखाद्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्यावर त्याला दिलेले काम काढून घेतले जाते. त्या कामासाठी नव्याने निविदा काढून इतर ठेकेदारांकडून काम करून घेतले जाते.