Join us

कर्जाच्या दुप्पट रक्कम भरूनही पैशांसाठी ब्लॅकमेल

By मनीषा म्हात्रे | Published: April 16, 2023 7:08 PM

लोन अँपद्वारे फसवणूक करणारा कर्नाटक मधून जाळ्यात, एलटी मार्ग पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कर्जाच्या दुप्पट रक्कम भरूनही पैशांसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या दुकलीला कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे. एल टी मार्ग पोलिसांनी हि कारवाई केली आहे. दोघेही मूळचे मध्यप्रदेशचे रहिवासी असून याप्रकरणी त्यांच्याकडे अधिक तपास सुरु आहे. दुकलीने २२ मोबाईल सिम कार्ड तसेच फसवणूक केलेली रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी १७ बँक खात्यांचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी ऑक्टोंबर २०२२ पासून फेब्रुवारी २०२३ दरम्यान २ लाख ९३ हजार ७०० रुपयांचे ऑनलाईन कर्ज घेतले होते. लोनची प्रोसेसिंग फी व व्याज वजा होवून त्यांना १ लाख ९५ हजार ३९० रुपये मिळाले. त्यानंतर, त्यांनी कर्जाची परतफेड करत ५ लाख ३ हजार ८५७ रुपये भरले. त्यानंतर, आरोपींकडून पैशांसाठी तगादा सुरु होता. पैसे न भरल्यास त्यांचा चेहरा असलेला नग्न फोटो मित्रांना पाठविण्याची धमकी देत होते.

९ फेब्रुवारी रोजी त्यांनी पैसे भरण्यास नकार देताच आरोपीने त्यांचे मॉर्फ केलेले नग्न फोटो मित्रांना पाठवले. याबाबत समजताच त्यांना धक्का बसला. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला.

तपासात, गुन्हयात वापरण्यात आलेल्या मोबाईल फोनचा एसडीआर व सीडीआर प्राप्त करून त्याचे विश्लेषण केले असता त्यांना एसडीआर मधील पत्ता हा मध्य प्रदेश  तर, आरोपीचे लोकेशन हे बिजापूर, कर्नाटक येथील असल्याचे दिसून आले. आरोपींनी  गुन्हा करण्यासाठी वेगवेगळे २२ मोबाईल सिम कार्ड व फसवणूक केलेली रक्कम हस्तांतरीत करण्यासाठी १७ बँक खात्यांचा वापर केल्याचे स्पष्ट झाले.

पुढे याच माहितीच्या आधारे पथकाने कर्नाटकमध्ये धाव घेतली. मात्र आरोपी विविध सिमकार्ड वापरत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहचण्यास अडचणी निर्माण होत होत्या. अखेर, सततच्या पाठलागानंतर आरोपीना बिजापूर येथून अटक करण्यास पथकाला यश आले. याप्रकरणी त्यांच्याकडे अधिक तपास सुरु आहे. पोलीस उपायुक्त डॉ. अभिनव देशमुख, सहायक पोलीस आयुक्त जोत्स्ना रासम,वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. 

टॅग्स :गुन्हेगारी