ब्लॅकमेल करून विवाहितेवर बलात्कार,तीन महिन्यांनंतरही आरोपी मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 03:18 AM2017-09-04T03:18:15+5:302017-09-04T03:18:27+5:30
विवाह करण्याचे आश्वासन देत, महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून नितीन पांचाळ या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होऊन तीन महिने उलटले,
मुंबई : विवाह करण्याचे आश्वासन देत, महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून नितीन पांचाळ या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होऊन तीन महिने उलटले, तरी चारकोप पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नसल्याने, पीडित महिलेने याबाबत पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे.
विवाह करण्याचे वचन देत शरीरसंबंध ठेवून अश्लील छायाचित्रे काढल्याच्या आरोपावरून, मालाड (पूर्व) येथील महेंद्र नगरात राहणाºया नितीन पांचाळ याच्याविरुद्ध पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सहा वर्षांपूर्वी आपली नितीन पांचाळ याच्याशी ओळख झाली होती. तेव्हा आपण घटस्फोटीत असल्याचे सांगून आरोपीने आपल्याशी विवाह करण्याचे वचन दिले. त्या दरम्यान शरीरसंबंधही ठेवले. त्याच वेळी आपला विश्वास संपादन करून एक लाख रुपयांची मागणी केली. विवाह करण्याचे ठरले असल्याने, आपण ३ टक्के व्याजाने त्याला कर्ज काढून दिले. बरेच दिवस ती रक्कम परत न केल्याने विचारणा केली असता, त्याने धमकावल्याचे तक्रारदार महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पैसे मागितल्यानंतर पांचाळने मोबाइलमधील माझ्या नकळत आधीच काढलेले माझे अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. काही फोटो त्याने आपल्या मोबाइलवरही पाठविल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
पोलीस याबाबत तक्रार दाखल करण्यात टाळाटाळ करीत होते. त्यामुळे खासदार हुसेन दलवाई यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले. मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेत, कारवाईचे लेखी आदेश दिल्यानंतर, २0 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिलेचे वडील ज्येष्ठ पत्रकार असून, सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना, त्यांनी आपल्या मुलीची फसवणुकीची दखल घेण्याबाबत पोलीस आयुक्तांना साकडे घातले आहे. आरोपीने मोबाइलद्वारे अश्लील चित्रीकरण केल्याने, बलात्काराचा गुन्हा दाखल करताना, पोलिसांनी आयटी अॅक्टच्या कलम ६७ (ए) करायला हवे होते, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. आमदार सय्यद इम्तियाज जलील आणि ज्योती कलानी यांनीही गृहमंत्र्यांना याबाबत पत्र पाठवून तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.