ठाणे : सत्ता स्थापनेवरून संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण तापले असतानाच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक आरोप करून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. पालघरमध्ये काही आमदारांच्या व्हिडीओ क्लिप्स एका ज्येष्ठ अधिकाऱ्यामार्फत गोळा केल्या जात आहेत. हे आमदार कोण आहेत, तसेच त्यांच्या क्लिप्स गोळा करणारा ज्येष्ठ अधिकारी कोण आहे, ते आव्हाड यांनी उघड केले नाही. मात्र, सत्तेत राहण्यासाठी सरकारी यंत्रणांचा तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून ब्लॅकमेलिंग करणे ही सरकारची भूमिका योग्य नसल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
सत्ता स्थापनेवरून सेना-भाजप या दोघांनीही ताठर भूमिका सोडलेली नाही. बहुमत सिद्ध करण्यासाठी आमदारांच्या पाठबळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हे चित्र असताना, जितेंद्र आव्हाड यांनी सरकारी यंत्रणांवर केलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. पालघरमध्ये विरोधी पक्षाचे पाच आमदार असून, एक आमदार सेनेचा आहे. एका ज्येष्ठ अधिकाºयाने विशिष्ट आमदारांच्या काही व्हिडीओ क्लिप्स आणि भाषणे मला पाहिजेत, असे वक्तव्य केले आहे. या सर्व गोष्टी या अधिकाऱ्यांना कशाला हव्या आहेत, असा प्रश्न आव्हाड यांनी केला आहे. याचाच अर्थ सरकारी यंत्रणेचा वापर करून ब्लॅकमेलिंग सुरू होणार आहे. केवळ सत्तेत राहण्यासाठी सरकारची ही ब्लॅकमेलिंगची भूमिका योग्य नसल्याचा आरोप त्यांनी केला.महाराष्ट्राची संस्कृती लयास जाईल३५६ कलम आणि राज्य तसेच केंद्र सरकार यांचे संबंध, या गोष्टींकडे कधीच सर्वसामान्य जनतेचे लक्ष जात नाही. ३५६ कलम हे इतिहासात खूप वेळा वापरलं आहे. याचा वापर करून विधानसभा घालवून राष्ट्रपती राजवट लागू करायची. दुसरा धोका घोडेबाजारचा आहे. सरकार घोडेबाजी करेल आणि महाराष्ट्राची संस्कृती लयास जाईल, अशी चिंता आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी विरोधी पक्षात बसण्याची भूमिका घेतली असून, ती कायम राहणार असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.