Join us

‘ब्लेड मॅन’ गजाआड

By admin | Published: July 22, 2016 3:22 AM

गर्दीच्या वेळी ब्लेडने प्रवाशांचे खिसे कापून मोबाइल फोन आणि मौल्यवान वस्तू लंपास करणाऱ्या ‘ब्लेड मॅन’ला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली.

मुंबई : गर्दीच्या वेळी ब्लेडने प्रवाशांचे खिसे कापून मोबाइल फोन आणि मौल्यवान वस्तू लंपास करणाऱ्या ‘ब्लेड मॅन’ला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली. तपासणी दरम्यान पोलिसांना त्याच्या तोंडामध्ये ५ ब्लेड्स आढळली. तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.काही महिन्यांपासून कुर्ला आणि घाटकोपर रेल्वे स्थानकांदरम्यान मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे खिसे कापले जात असल्याच्या तक्रारी रेल्वे पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी स्थानकांवर गस्त वाढवली होती. आज सकाळी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यातील महिला पोलीस शिपाई गीताजंली रानकर या घाटकोपर स्थानकावर गस्त घालत होत्या. याच दरम्यान एका तरुण त्यांना स्थानकावर संशयास्पदरित्या वावरताना आढळला. त्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. तो सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढला. महिला पोलीस शिपाईही त्याच्यासोबत लोकलमध्ये चढल्या. काही वेळातच आरोपीने एका प्रवाशाचा मोबाईल चोरला. त्यामुळे महिला पोलिसाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र कुर्ला रेल्वे स्थानक येताच आरोपीने लोकलमधून उडी मारली. महिला पोलीस शिपाई गीतांजली यांनीदेखील त्याच्यापाठोपाठ उडी मारत त्याला स्थानकावर पकडले.रमेश नागेर (२३) असे या आरोपीचे नाव आहे. झडती दरम्यान त्याच्याजवळ दोन मोबाइल फोन आणि तोंडामध्ये पाच ब्लेड्स आढळली. पोलिसांनी अथवा प्रवाशांनी पकडल्यानंतर स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी हा आरोपी स्वत:वरच ब्लेडने वार करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)