Join us

स्मार्ट सिटीचा ठपका प्रशासनावर

By admin | Published: December 10, 2015 2:03 AM

स्मार्ट सिटी स्पर्धेविषयी आयत्या वेळी भुमीका बदलणाऱ्या राष्ट्रवादी काँगे्रसने सर्व खापर प्रशासनावर फोडले आहे. प्रशासनाने उपक्रम राबविताना व प्रस्ताव तयार करताना विश्वासात घेतले नाही.

नामदेव मोरे,  नवी मुंबईस्मार्ट सिटी स्पर्धेविषयी आयत्या वेळी भुमीका बदलणाऱ्या राष्ट्रवादी काँगे्रसने सर्व खापर प्रशासनावर फोडले आहे. प्रशासनाने उपक्रम राबविताना व प्रस्ताव तयार करताना विश्वासात घेतले नाही. अंधारात ठेवून एसपीव्ही पद्धत लादण्याचा प्रयत्न केला. नगरसेवकांना न सांगताच विदेशी कंपनीशी करार केल्याचा ठपका राष्ट्रवादी काँगे्रसने प्रशासनावर ठेवला असून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र शासनाने स्वच्छ शहरांचे सर्वेक्षण सुरू केल्यानंतर ७ मार्च ला महापालिकेने कोपरखैरणेमधील जुन्या क्षेपणभुमीवर भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मोठ्या उत्साहात या योजनेचा शुभारंभ करून तत्कालीन महापौर सागर नाईक यांनी देशातील पहिल्या तिन शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश होणारच असा दावा केला होता. खरोखर देशात तिसरा क्रमांक व राज्यात पहिला क्रमांक आल्यानंतर सर्वांनी नाईक यांचे भविष्य खरे ठरण्याचे मत व्यक्त केले होते. यानंतर स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये देशात पहिला क्रमांक मिळविण्याचा निर्धार सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसने केला होता. जुलैपासून पुर्ण शहर पिंजून काढले होते. आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांनी झाडू हातात घेवून साफसफाई मोहीम राबविली. महापौर सुधाकर सोनावणे व आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुख्याद्यापक व प्राचार्यांशी संवाद साधून या मोहीमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. विद्यार्थी व पालकांकडून साडेतीन लाख अर्ज भरून घेतले होते. चित्रांच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांनी त्यांची मते मांडली होती. महापालिका मुख्यालयामध्ये सुरू केलेल्या वॉर रूमला संगीतकार शंकर महादेवन यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली होती. महापालिकेने स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये शहरवासीयांना सामावून घेण्यासाठी वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात कार्यक्रम आयोजीत केला होता. त्या कार्यक्रमास आमदार संदीप नाईकांसह राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. ७ नोव्हेंबरला आयोजीत केलेल्या वॉकेथॉनमध्ये २७ हजार शहरवासी उपस्थित होते. या कार्यक्रमासही राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक, महापौर, आमदार उपस्थित होते. महापालिका प्रशासन चार महिने विविध उपक्रम राबवत असून त्या सर्व उपक्रमांची माहीती सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही होती. परंतू यानंतरही राष्ट्रवादी काँगे्रसने प्रस्तावास विरोध करून सर्व खापर प्रशासनावर फोडले आहे. यामुळे महापालिकेमधील अधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे. प्रशासनाने एसपीव्ही प्रणालीविषयीची माहीती लपवून ठेवली. ८ हजार कोटींचे प्रस्ताव तयार करतानाही विश्वासात घेतले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सिडकोच्या कार्यक्रमात मनपा आयुक्त दिनेश वाघमारे यांनी विदेशी कंपनीशी केलेल्या कराराची कोणतीच माहीती महापौर व नगरसेवकांना दिली नसल्याचा आरोप केला. प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने काम केल्याचा ठपका राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी ठेवला आहे. यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.