Join us  

चेंबूरमध्ये इंडस्ट्रीयलच्या पॉवर हाउसमध्ये स्फोट

By admin | Published: April 08, 2017 11:33 PM

पॉवर हाउसमध्ये दुरुस्तीचे काम सुरू असताना, अचानक स्फोट होऊन आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी चेंबूर येथे घडली. या घटनेत रिलायन्स एनर्जीचे चार कर्मचारी गंभीर जखमी

मुंबई : पॉवर हाउसमध्ये दुरुस्तीचे काम सुरू असताना, अचानक स्फोट होऊन आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी चेंबूर येथे घडली. या घटनेत रिलायन्स एनर्जीचे चार कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, यातील तिघांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर एकावर गोदरेज रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती गोवंडी पोलिसांनी दिली आहे. चेंबूरच्या वामन तुकाराम पाटील मार्गावरील आयडियल देवजी केशवजी इंडस्ट्रियल इस्टेट येथील पॉवर हाउसमध्ये शनिवारी सकाळी काही बिघाड झाला होता. त्यामुळे सकाळी १० वाजल्यापासून रिलायन्स कंपनीचे काही कर्मचारी दुरुस्तीचे काम करत होते. दरम्यान, काम सुरू असताना साडेअकराच्या सुमारास अचानक या पॉवर हाउसमध्ये मोठा स्फोट झाला. त्यानंतर, तत्काळ संपूर्ण केबिनमध्ये आग लागली. या ठिकाणी शैलेश राणे (३५), रमेश गडाम (३०), बी. ओक (४०) आणि एस घाग (५५) हे चार कर्मचारी काम करत होते. या आगीत ते गंभीर जखमी झाले होते. इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढून तत्काळ गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र, चौघांची प्रकृती गंभीर असल्याने, त्यांना पुढील उपचारांसाठी सायन आणि गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी संध्याकाळी या चौघांना ऐरोली येथील बर्न्स रुग्णालयात हलवण्यात आले.स्फोटामुळे हा परिसर हादरल्याने रहिवाशांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर, काहींनी ही माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली. याबाबत गोवंडी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, अजून तरी हा स्फोट कशामुळे झाला, हे कळू शकलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)