Join us  

शिवसेनेचा धमाका; काँग्रेसची पीछेहाट

By admin | Published: February 25, 2017 3:44 AM

मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा वांद्रे पूर्व ते सांताक्रुझ पूर्व या एच ईस्ट वॉर्डमध्ये शिवसेनेने डबल धमाका केला. गेल्या पालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा सेनेच्या विजयी

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा वांद्रे पूर्व ते सांताक्रुझ पूर्व या एच ईस्ट वॉर्डमध्ये शिवसेनेने डबल धमाका केला. गेल्या पालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा सेनेच्या विजयी उमेदवारांची संख्या दुप्पट झाली़ वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व व पश्चिम (एच ईस्ट आणि वेस्ट) या दोन्ही भागांत शिवसेना व भाजपामुळे काँग्रेसची अक्षरश: पीछेहाट झाली. काँग्रेसला फक्त दोनच जागांवर समाधान मानावे लागले. २0१२ साली झालेल्या पालिका निवडणुकीत एच ईस्ट वॉर्ड हा प्रभाग क्रमांक ८१ ते ९१ असा होता. त्या वेळी शिवसेनेचे सर्वाधिक ४ उमेदवार निवडून आले होते. काँग्रेसचे ३, मनसेचा १ आणि भाजपाचा १ उमेदवार निवडून आला होता. यंदाच्या पालिका निवडणुकीत प्रभागांची फेररचना करण्यात आली़ त्यात एक प्रभाग कमी झाला. प्रभाग ८७ ते प्रभाग ९६ असे प्रभाग झाले. शिवसेनेची प्रतिष्ठेची लढाई असल्याने या प्रभागातील सर्व जागा जिंकून आणण्यासाठी सेनेने जोरदार प्रचार केला. जनतेने कौल दिल्याने सेनेचे ८ उमेदवार निवडून आले. प्रभाग ८७ची लढत रंगतदार झाली़ भाजपाचे दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले कृष्णा पारकर यांचा शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांनी अवघ्या ३४ मतांनी पराभव केला. एच वेस्ट या वांद्रे पश्चिम ते सांताक्रुझ पश्चिम परिसरात काँग्रेसचे वर्चस्व आहे. गेल्या पालिका निवडणुकीत काँग्रेसचे ४ उमेदवार निवडून आले होते. यंदा मात्र काँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. प्रभाग क्रमांक १0१मधून आसिफ झकेरिया हे विजयी झाले. अशीच परिस्थिती एच ईस्ट वॉर्डमध्येही झाली. २0१२मध्ये काँग्रेसच्या ३ उमेदवारांनी विजय मिळवला होता. या वेळी प्रभाग ९0मधून तुलिप मिरांडा या एकमेव उमेदवार जिंकून आल्या. भाजपाला या वॉर्डमधून ३ जागांवर विजय मिळाला. गेल्या पालिका निवडणुकीत हाच आकडा एकवर होता. मनसेचे इंजिन दोन्ही वॉर्डमध्ये घसरले. (प्रतिनिधी)