मुंबई: ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण टिकेकर यांच्या संपादकीय कारकीर्दीच्या आढावा घेत त्यांच्यातील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वाच्या आठवणी सांगताना त्यांचे सुहृद हळहळले. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात डॉ. टिकेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा झाली. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या सभेत मान्यवरांनी टिकेकरांच्या ऋणानुबंधाचे पैलू उलगडून दाखविले. टिकेकर यांच्या विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. सोमवार, १ फेब्रुवारी हा टीकेकर यांचा वाढदिवसही असल्याने यावेळी दु:खाची किनार अधिक गडद झाली होती. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ, प्रा. जे. बी. नाईक, मृदुला जोशी यांनी डॉ. टिकेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी, मुंबई विद्यापीठाच्या संग्रहातील डॉ. टिकेकर यांची दृश्यध्वनीफित दाखविण्यात आली.याप्रसंगी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख म्हणाले, की टिकेकरांच्या कार्यातून पुढच्या पिढीने शिकणे ही टिकेकरांना खरी श्रद्धांजली ठरेल. टिकेकर यांनी माझ्यातील कलागुणांना वाव देऊन कायम प्रोत्साहित केले. ‘व्यवस्था बदलण्यासाठी व्यवस्थेचा भाग झाले पाहिजे’ या त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन विद्यापीठ व्यवस्थापन प्रक्रियेत सहभागी झालो. विद्यापीठाबद्दल टिकेकरांना सखोल आत्मियतेची भावना होती. टिकेकरांनी स्वत:कडील १५ हजार एवढ्या ग्रंथसंपदेचे दान विद्यापीठाला दिले. टिकेकरांना अपेक्षित असलेल्या बदलांकडे विद्यापीठाची वाटचाल सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांनीही टिकेकरांशी असलेल्या स्नेहपूर्ण नात्याचे पैलू उलगडले. ते म्हणाले, आमच्या प्रकृती भिन्न होत्या. मात्र टिकेकर यांनी कायम प्रोत्साहन दिले. त्यामुळेच मराठी पत्रकारिता क्षेत्रात यायचे धाडस केले. ६-७ वर्षांच्या त्यांच्या सहवासात कायम ज्ञानात भर पडली, टिकेकर हे गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे.ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी टिकेकर यांच्या आठवणींना उजाळा देताना ‘टिकेकरांचा स्नेह हीच खरी श्रीमंती’ असल्याचे सांगितले. टिकेकरांनी जी मूल्ये, तत्त्वे सांगितली, ती त्यांनी कायम आचरणात आणली. शिवाय, विलासराव देशमुख यांच्या काळात टिकेकर यांना पद्म पुरस्कारासाठी विचारणा झाली होती, असे सांगून टिकेकर यांनी मात्र ज्यांचा सन्मान करायचा राहिला, अशा व्यक्तिंना सन्मानित करण्याचे सुचविल्याचे सांगितले. टिकेकर यांना पुरस्कार, मान-सन्मान मिळण्याचे दु:ख कधीच झाले नाही. त्यांच्याकडे ज्ञान व तत्त्वांची श्रीमंती होती. टिकेकर यांचे जाणे हा काही अंशी आपलाही मृत्यू असल्याची भावना कुवळेकर यांनी व्यक्त केली.प्रा. जे.बी. नाईक यांनीही टिकेकर यांना पद्म पुरस्कार देण्याची भावना व्यक्त केली. ते म्हणाले, आमचे रोज फोनवर बोलणे व्हायचे. तसेच, टिकेकर आर्वजून रविवारी भेटत असत. त्यावेळी एकत्र बसून कुमारगंधर्वाचे संगीत ऐकणे आवडायचे. मुंबई विद्यापीठासाठी टिकेकरांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या जाण्याने एका मोठ्या असामान्य व्यक्तिला आपण हरवून बसलो आहोत, असेही ते म्हणाले.यावेळी, माधव शिरवळकर यांनी टिकेकर हे माझ्यासाठी सर्वच दृष्टीने मोठे असल्याचे सांगितले. तसेच, खादाडी आणि ज्ञानाडी करण्याची सर्वाधिक संधी टिकेकरांनामुळे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. इतिहास क्षेत्राच्या वृद्धीसाठी त्यांची खरी गरज असताना टिकेकरांच्या जाण्याने खूप मोठे दुहेरी नुकसाना झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.या सभेत डॉ. टिकेकर यांनी वेळोवेळी मांडलेले विचार ‘लोकमत’चे आॅनलाईन एडिटर चंद्रशेखर कुलकर्णी यांनी वाचून दाखवले. या कार्यक्रमाला ‘लोकमत’चे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा, साहित्यिका मीना वैशंपायन, एशियाटिकचे सदस्य यांची उपस्थिती होती. या सभेत अनुपस्थित राहिलेल्या सुधीर गाडगीळ, अभिनंदन थोरात यांच्या संदेशांचे वाचनही करण्यात आले.या सभेत टिकेकर यांच्या पत्नी प्रा. मनिषा टिकेकर यांना चित्रकार नीलेश जाधव याने रेखाटलेले टिकेकर यांचे व्यक्तिचित्र भेट दिले. (प्रतिनिधी)
टिकेकरांच्या आठवणींना उजाळा
By admin | Published: February 02, 2016 2:15 AM